सेवा पर्व २०२५; भाट्ये समुद्र किनारा स्वच्छता मोहीम यशस्वी
- by Yogesh Bandagale
- September 20, 2025
- 151 views
रत्नागिरी : सेवा पर्व 2025 अंतर्गत जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस विभाग, नगरपरिषद, ग्रामपंचायत भाट्ये, फिनोलेक्स, गद्रे मरीन, पटवर्धन हायस्कूल, रा. भा. शिर्के प्रशाला स्काऊट विद्यार्थी आदींच्या संयुक्त विद्यमाने भाट्ये समुद्र किनारा आज स्वच्छ करण्यात आला.
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी उपस्थित नागरिकांना आवाहन केले की, “प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवावा आणि पर्यावरणाला हातभार लावा. समुद्र, नदी आणि जलस्त्रोतांवरील प्रदूषण रोखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. स्वच्छता स्वत:पासून, आपल्या घरापासून करावी.”
भाट्ये किनार्यावर केंद्रीय वन व पर्यावरण विभागाचे अवर सचिव सत्यप्रकाश, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, MPCBचे उपप्रादेशिक अधिकारी उत्तम माने, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, तहसिलदार राजाराम म्हात्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, मुख्याधिकारी वैभव गारवे, सरपंच प्रीती भाटकर, फिनोलेक्सचे नरेश खरे आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून प्लास्टिक विरुद्ध जनजागृती मोहिमाही राबवली गेली. ‘एकल प्लास्टिक वापरू नका, एकच ध्यास ठेवू या – प्लास्टिक पिशवी हटवू या’ या संदेशासह कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले.
पटवर्धन हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी पथनाट्याद्वारे पर्यावरण राखण्याचा संदेश दिला. यासोबत उपस्थित नागरिकांनी ‘मी माझा समुद्रकिनारा वाचवत आहे’ ही शपथ घेतली. शपथीत त्यांनी समुद्रकिनाऱ्यावर कोणताही कचरा न टाकण्याची, समुद्री जीवसृष्टीवर प्लास्टिकचा परिणाम रोखण्याची आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याची प्रतिज्ञा केली.
कार्यक्रमात नारळाचे वृक्षारोपण करण्यात आले, तसेच प्र. जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील, जिल्हा कोषाधिकारी प्रविंद बिराजदार, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस जवान आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी कार्यक्रमाच्या समारोपात सांगितले की, “स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येकाने आपली जीवनशैली बदलून पर्यावरण पूरक निर्णय घ्यावा. प्लास्टिकचे प्रमाण कमी करणे आणि जलस्रोतांचे रक्षण हे आपले कर्तव्य आहे.”
