सुवर्णपदक विजेते कबड्डीपटू नितीन मदने यांची तहसीलदार पदावर नेमणूक
- by Yogesh Bandagale
- September 24, 2025
- 131 views
चिपळूण (प्रतिनिधी) : कबड्डीच्या मैदानावर भारताचा झेंडा उंच फडकवणारे आणि 2014 सालच्या इंचॉन (दक्षिण कोरिया) आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारे सुप्रसिद्ध कबड्डीपटू नितीन मदने यांची महाराष्ट्र शासनात तहसीलदार पदावर नेमणूक झाली आहे.
खेळाच्या माध्यमातून प्रगतीचा मार्ग शोधत प्रशासकीय क्षेत्रात नव्या अध्यायाची सुरुवात करणाऱ्या नितीन मदने यांच्या या यशाचा गौरव करण्यासाठी कार्यसम्राट आमदार शेखर निकम यांनी विशेष सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.
या वेळी आमदार शेखर निकम म्हणाले, “क्रीडाक्षेत्रात घाम गाळून देशासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या नितीन मदने यांनी आता प्रशासकीय क्षेत्रातही नवा इतिहास घडवला आहे. त्यांच्या वाटचालीतून आजच्या तरुणांना नवी प्रेरणा मिळेल.”
नितीन मदने यांनी प्रो कबड्डी लीगमध्ये यू मुम्बा व बंगाल वॉरियर्स संघातून आपली चमक दाखवली होती. आता तहसीलदार पदावर नेमणूक मिळाल्याने क्रीडा क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आमदार शेखर निकम यांनी त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि उज्ज्वल भविष्याची कामना व्यक्त केली.
