उद्योजक व प्रगतशील शेतकरी वसंत उदेग यांचा शिवसेनेत प्रवेश
- by Yogesh Bandagale
- January 07, 2026
- 258 views
चिपळूण : उद्योजक व प्रगतशील शेतकरी वसंत उदेग यांनी समाजासाठी अहोरात्र मेहनत घेतली असून, चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या विजयातही त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे गौरवोद्गार राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी काढले. बुधवारी कळवंडे येथे पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत वसंत उदेग यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी बोलताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, “यापूर्वी वसंत उदेग ज्या लोकांसोबत होते, त्यांनी रस्ते केले नाहीत, सभागृह उभारले नाही, धरणाचा प्रश्नही मार्गी लावला नाही. मात्र हे सर्व प्रश्न पालकमंत्री म्हणून मी नक्की सोडवेन. तुम्ही ज्या मार्गावर आला आहात, त्याचा तुम्हाला कधीही पश्चाताप होणार नाही.”
ते पुढे म्हणाले, “वसंत उदेग हे केवळ विकासासाठी शिवसेनेत आले आहेत. त्यांनी कोणतीही अट ठेवलेली नाही, तसेच निवडणूक लढवण्याची इच्छाही व्यक्त केलेली नाही. हीच त्यांची समाजनिष्ठा आणि प्रामाणिक भूमिका आहे,” असे सांगत पालकमंत्र्यांनी त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
कळवंडे येथे झालेल्या या प्रवेश सोहळ्यास शिवसेना तालुकाप्रमुख बापू आयरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळशेठ जाधव, गुहागरचे माजी सभापती राजेश बेंडल, माजी आमदार सदानंद चव्हाण, चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनोद झगडे, संदीप सावंत, शशीभाऊ चाळके, नगरसेवक कपिल शिर्के, नगरसेवक निहार कोवळे, सुयोग चव्हाण, निशांत जंगम, रुपेश घाग यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वसंत उदेग यांच्या शिवसेना प्रवेशामुळे कळवंडे परिसरात शिवसेनेची ताकद वाढली असून, विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
