सीजीपीएचा क्रीडामहोत्सव दिमाखात संपन्न
- by Yogesh Bandagale
- January 21, 2026
- 166 views
चिपळूण : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६ अंतर्गत आयोजित सीजीपीए स्पोर्ट २०२६ हा दोन दिवसांचा भव्य क्रीडामहोत्सव प्रचंड उत्साह, जोश आणि सीजीपीए डॉक्टर्सच्या अभूतपूर्व सहभागात यशस्वीरीत्या पार पडला. खेळाडूंची जिद्द, मैदानावरील थरार आणि प्रेक्षकांचा जल्लोष यामुळे हे दोन दिवस अविस्मरणीय ठरले.
डॉ. अल्ताफ सरगुरोह क्रीडा नगरी, अण्णासाहेब खेडेकर संकुल येथे या क्रीडामहोत्सवाचे उद्घाटन श्री हॉस्पिटलचे संचालक डॉ. अभिजीत सावंत आणि प्राईम डायग्नोस्टिकचे डॉ. मंगेश वाजे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी सीजीपीएचे अध्यक्ष डॉ. संदीप भागवत यांनी सर्व डॉक्टरांचे स्वागत करत, “कोकणामध्ये सीजीपीए ही अशी एकमेव संघटना आहे जिथे शंभरहून अधिक डॉक्टर्स मैत्री, एकोपा आणि टीमवर्क जपत दोन दिवस खेळांचा आनंद घेतात,” असे गौरवोद्गार काढले. डॉ. सावंत व डॉ. वाजे यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
दिवशी बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम आणि बुद्धिबळ या इंडोअर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. बॅडमिंटन कोर्टवर सीजीपीएचे स्टार खेळाडू झळकले. लेडीज व जेंट्स गटांतील सामने अत्यंत चुरशीचे व प्रेक्षणीय ठरले. कॅरम स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन डॉ. दाभोळे, बुद्धिबळाची जबाबदारी डॉ. रजत दाभोळकर, तर टेबल टेनिस स्पर्धा डॉ. धनंजय जोशी यांनी समर्थपणे सांभाळली.
दुसऱ्या दिवशी १०० मीटर धावणे, रिले रेस, व्हॉलीबॉल आणि अंडरआर्म क्रिकेट अशा विविध आउटडोअर स्पर्धा पार पडल्या. वेगवेगळ्या ठिकाणी सामने सुरू असूनही खेळाडूंचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. विशेषतः ४५+ वयोगटातील धावण्याच्या स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद अभिमानास्पद ठरला.
व्हॉलीबॉलचे सामने अटीतटीचे झाले, तर क्रिकेटमध्ये लेडीज सीजीपीए टीमने शिस्तबद्ध खेळ, आत्मविश्वास आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सर्वांची मने जिंकली. अंतिम सामने थरारक व रोमांचक ठरले.
विक्रमी सहभाग आणि यशस्वी नियोजन
या क्रीडामहोत्सवात सीजीपीएच्या सीनियर व जूनियर मिळून १०० हून अधिक डॉक्टरांनी सहभाग नोंदवला, ही यावर्षीची सर्वात मोठी आणि अभिमानास्पद बाब ठरली. स्पर्धांनंतर स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या स्पर्धांचे यशस्वी नियोजन स्पोर्ट्स इन्चार्ज डॉ. रणजीत पाटील यांनी केले. कमिटी सदस्य डॉ. अभिजीत दुधाळ, डॉ. ओंकार बेल्लारीकर, डॉ. स्नेहल जोशी यांनी विशेष मेहनत घेतली.
डॉ. ऋषिकेश चितळे, डॉ. राकेश चाळके, डॉ. अरुण पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच डॉ. अजित दाभोळकर, डॉ. प्रसाद दळी, डॉ. कृष्णकांत पाटील, डॉ. संतोष दाभोळकर, डॉ. खांबे, डॉ. संदीप दाभोळकर, डॉ. प्रसाद खातू, डॉ. समीद चिकटे, डॉ. उमेश खेडेकर, डॉ. सुभाष उतेकर यांसह अनेक सीजीपीए डॉक्टर्सच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्यामुळेच हा कार्यक्रम भव्य व यशस्वी झाला.
बक्षीस वितरण २४ जानेवारी रोजी, हॉटेल डी स्टार रिसॉर्ट, पेढांबे येथे आयोजित गॅदरिंगमध्ये उत्साहात पार पडणार आहे.
