चिपळुणात उद्या ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष अभिनय स्पर्धा

चिपळूण : अखिल भारतीय नाट्य परिषद, चिपळूण शाखेच्या वतीने ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिक कलाकारांसाठी एकपात्री व द्विपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या प्रतिभेला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात येत आहे.

चिपळूण शहर व परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक कलाकारांसाठी ही स्पर्धा एक सांस्कृतिक पर्वणी ठरणार असून, त्यांच्या अनुभवसंपन्न अभिनयाचा आस्वाद रसिक प्रेक्षकांना घेता येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन चिपळूण नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री. उमेश धोंडीराम सकपाळ यांच्या हस्ते होणार असून, ते अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणचे सदस्यही आहेत. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. विशाल श्रीरंग भोसले उपस्थित राहणार आहेत.

ही विशेष अभिनय स्पर्धा रविवार, दि. ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये एकपात्री व द्विपात्री अभिनयाचे सादरीकरण होणार असून, ज्येष्ठ कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.

अखिल भारतीय नाट्य परिषद, चिपळूण शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन आणि स्पर्धा प्रमुख ॲड. विभावरी राजपूत यांनी चिपळूण शहर व परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.

संबंधित लेख