सांगमेश्वर तालुक्यात कडवई जि.प. गटाची महत्त्वपूर्ण बैठक

 

सांगमेश्वर : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुक्यातील कडवई जिल्हा परिषद गटाची एक महत्त्वपूर्ण बैठक आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत सध्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीचा तसेच राजकारणात सुरू असलेल्या उलथापालथींचा सखोल आढावा घेण्यात आला.

राजकीय समीकरणे सातत्याने बदलत असताना पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याची गरज आमदार शेखर निकम यांनी अधोरेखित केली. युती झाली तर ती स्वागतार्हच आहे; मात्र युती झाली नाही तरी स्वबळावर सक्षमपणे निवडणूक कशी लढवता येईल, याबाबत कार्यकर्त्यांशी खुला, स्पष्ट व सकारात्मक संवाद साधण्यात आला. संघटनेतील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून प्रामाणिकपणे काम केल्यास यश निश्चित मिळते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांकडून एकसूरात भावना व्यक्त करण्यात आल्या. “आपण सांगाल ते धोरण आणि तुम्ही बांधाल ते तोरण,” अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी आमदार शेखर निकम यांच्यावरील आपला विश्वास व निष्ठा व्यक्त केली. यावेळी आमदार निकम यांनी उपस्थितांना आश्वस्त करत सांगितले की, विकासकामांसाठी निधीच्या बाबतीत कधीही कमी पडू दिले जाणार नाही. गावविकासासाठी पक्षभेद न ठेवता काम केले जाईल. मात्र कार्यकर्त्यांनी आपले काम चोखपणे व प्रामाणिकपणे करावे, पक्ष संघटना अधिक बळकट करावी आणि पक्षाने दिलेला उमेदवार कोणताही असो, वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून त्याला बहुमताने निवडून आणावे, असे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीला राजेंद्र सुर्वे, राजेंद्र पोमेडकर, तुकाराम येडगे, संतोष जाधव, सहदेव सुवरे, पप्पू ब्रीद, संतोष भडवळकर, राजेश मोहिते, उदय मोहिते, बाबुराव मोहिते, संतोष चरकरी, अशोक चव्हाण, भाई गुरव, संतोष अलीम, मनोहर खासासे, डिके गावकर, पांडुरंग डिके, सीताराम चिले, बाईत गावकर, कृष्णा ओकते, बाळकृष्ण डिके आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीतून संघटनेत नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी एकजुटीने आणि ताकदीने काम करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित लेख