शिवसेनेकडून विक्रांत लवेकर यांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी
- by Yogesh Bandagale
- January 09, 2026
- 1036 views
चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेकडून उपशहरप्रमुख व माजी आमदार सदानंद चव्हाण यांचे विश्वासू सहकारी विक्रांत लवेकर यांना संधी देण्यात आली आहे. याबाबतचा अर्ज शिवसेना गटनेते अंकुश आवले यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला.
चिपळूण नगरपरिषद निवडणुकीदरम्यान पेठमाप प्रभाग क्रमांक ३ मधून शिवसेनेकडून विक्रांत लवेकर यांच्यासह विभागप्रमुख प्रमोद बुरटे हे इच्छुक होते. मात्र पक्षहिताचा विचार करत शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी लवेकर यांना माघार घेण्याची सूचना केली. पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानत लवेकर यांनी उमेदवारी मागे घेत बुरटे यांचा मार्ग मोकळा करून दिला.
इतकेच नव्हे तर या प्रभागातील मित्रपक्ष भाजपच्या उमेदवार रुपाली दांडेकर यांच्या विजयासाठीही लवेकर यांनी सक्रिय सहभाग घेतला. उपशहरप्रमुख पदावर कार्यरत असलेले विक्रांत लवेकर हे गेली अनेक वर्षे शिवसेनेशी प्रामाणिक राहिले असून, पक्षासाठी स्वतःच्या उमेदवारीचा त्याग करत त्यांनी पक्षनिष्ठेचे उदाहरण घालून दिले.
या त्यागाची दखल घेत माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी लवेकर यांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी देत योग्य सन्मान दिला आहे. त्यामुळे एका सामान्य शिवसैनिकाला न्याय मिळाल्याची चर्चा शहरात सुरू असून, शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
