ऐतिहासिक दुर्ग गोविंदगडावर भव्य शिवजन्मोत्सव सोहळा

चिपळूण, दि. १६ : चिपळूणचा मानबिंदू असलेल्या दुर्ग गोविंदगड (गोवळकोट) येथे गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राजे सामाजिक प्रतिष्ठान व गोवळकोट ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा साजरा केला जाणार असून यंदा या उपक्रमाचे १२ वे वर्ष आहे.

गेल्या ११ वर्षांपासून राजे सामाजिक प्रतिष्ठान गडसंवर्धन, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. त्याच कार्याचा एक भाग म्हणून दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

सकाळी पूजन व शस्त्रप्रदर्शन

शिवजन्मोत्सवाची सुरुवात सकाळी ७ वाजता गडाचे पूजन, गडदेवता श्री देवी रेडजाई माता यांचे पूजन व ध्वजपूजनाने होणार आहे. सकाळी ९.३० वाजता शिवप्रतिमेचे विधिवत पूजन व आरती करण्यात येईल.

सकाळी १० वाजल्यापासून कोकण दौलत प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवकालीन शस्त्रप्रदर्शन तसेच पुरातन वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या माध्यमातून शिवकालीन युद्धकला, शस्त्रसज्जता आणि तत्कालीन जीवनपद्धतीची माहिती नागरिकांना व तरुण पिढीला प्रत्यक्ष अनुभवातून मिळणार आहे.

सायंकाळी मर्दानी खेळांचे सादरीकरण

सायंकाळी ६ वाजता प्रमुख मान्यवरांचा सत्कार समारंभ व विविध ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सायंकाळी ७ वाजता शंभू राजे मर्दानी खेळ विकास मंच, कोल्हापूर यांच्या वतीने तलवारबाजी, लाठीकाठी आदी पारंपरिक मर्दानी खेळांचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमातून शिवकालीन पराक्रम आणि स्वराज्याची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या शिवजन्मोत्सव सोहळ्यास जास्तीत जास्त शिवप्रेमी, गडप्रेमी, इतिहासप्रेमी तसेच सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

संबंधित लेख