विज्ञान प्रदर्शनात सुमन विद्यालय, टेरवचा प्रथम क्रमांक
- by Yogesh Bandagale
- January 14, 2026
- 100 views
चिपळूण : माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल देवरुख आणि सृजन सायन्स सेंटर, देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन नुकतेच देवरुख येथे उत्साहात संपन्न झाले. या प्रदर्शनात सुमन विद्यालय, टेरव यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत नेत्रदीपक यश संपादन केले.
माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात कुमारी तन्वी प्रदीप सागवेकर व कुमार प्रथमेश मनोहर मांडके यांनी सादर केलेल्या “मल्टीपर्पज वायरलेस अलर्ट सिस्टीम” या अभिनव उपकरणाला प्रथम क्रमांक मिळाला. या प्रकल्पाची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.
तसेच सुमन विद्यालय, टेरव यांच्यामार्फत उच्च प्राथमिक गटात कुमारी विभावरी संतोष वास्कर व कुमार हर्ष विजय गावडे यांनी सादर केलेले “वृद्धांचा सोबती” हे उपकरणही प्रदर्शनात विशेष आकर्षण ठरले.
या विज्ञान प्रदर्शनाच्या दिमाखदार पारितोषिक वितरण सोहळ्यात देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. सदानंद भागवत, देवरुख पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. विजय परीट, विस्तार अधिकारी श्री. नाईक, श्री. बळवंतराव, श्री. त्रिभुवणे, केंद्रप्रमुख श्री. अभिमन्यू शिंदे, तसेच शिक्षण विभागाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री. सुदेश कदम, सचिव श्री. सुभाष सोकासने व मंडळाचे अन्य संचालकही उपस्थित होते.
प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. या विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक श्री. अमोल शशिकांत टाकळे व मुख्याध्यापक श्री. मंदार प्रभाकर सुर्वे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. विकास कदम, सचिव श्री. योगेश कदम, खजिनदार श्री. अजित कदम, संचालक मंडळ, चिपळूण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. दादासाहेब इरनाक, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, ग्रामस्थ, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून नागपूर येथील राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.
