आनंदराव पवार महाविद्यालयात ‘अंतरंग’ महोत्सवाचे उत्साहात आयोजन
- by Yogesh Bandagale
- December 24, 2025
- 89 views
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सांस्कृतिक उपक्रमांना विशेष महत्त्व
चिपळूण : श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री आनंदराव पवार महाविद्यालयात ‘श्रीराम महोत्सव – अंतरंग २०२५–२६’ या तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रमांसोबतच सांस्कृतिक उपक्रमांना विशेष महत्त्व दिले जात असल्याचे या महोत्सवातून दिसून येते.
या महोत्सवाचे उद्घाटन कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीचे सदस्य तसेच नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय श्री. निहार कोवळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी मान्यवर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच नवनिर्वाचित नगरसेवक श्री. निहार कोवळे यांचा वाढदिवस महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेच्या कार्याध्यक्ष सौ. सई वरवाटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कॉलेज जीवन हे व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा.
यावेळी परांजपे मोतीवाले हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीत प्रथम आलेली तसेच विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेली आनंदराव पवार महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. वेदिका हरवडे हिचा अष्टपैलू कामगिरीबद्दल सौ. अस्मिता खातू यांच्या वतीने रोख बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.
संस्थेचे कार्यवाह श्री. प्रशांत देवळेकर यांनी महाविद्यालयातील खेळाडू तसेच विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन उत्कृष्टरीत्या केल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कॉलेज कमिटीचे अध्यक्ष श्री. मल्लेश लकेश्री यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, परीक्षेतील गुणांबरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला, क्रीडा व सर्जनशील गुणांना योग्य व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी उच्च पदांपर्यंत पोहोचावेत, यासाठी संस्थेचा सातत्याने प्रयत्न राहील.
नवनिर्वाचित नगरसेवक श्री. निहार कोवळे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर यश संपादन करत असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. उदय शेठ गांधी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, विद्यार्थ्यांमधील कला, गुण, आत्मविश्वास, संघभावना आणि सर्जनशीलता विकसित करण्याच्या उद्देशाने ‘अंतरंग २०२५–२६’ या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमास त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या महोत्सवांतर्गत ग्रुप सिमिलॅरिटी, ट्रॅडिशनल डे, म्युझिकल चेअर यांसारख्या विविध मनोरंजक व सर्जनशील कार्यक्रमांचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष श्री. उदय गांधी, उद्घाटक श्री. निहार कोवळे, कार्याध्यक्ष सौ. सई वरवाटकर, संस्थेचे उपकार्याध्यक्ष श्री. राजन खेडेकर, कार्यवाह श्री. प्रशांत देवळेकर, बांधकाम समितीचे अध्यक्ष श्री. सुहास चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी व कॉलेज कमिटीचे अध्यक्ष श्री. मल्लेश लकेश्री, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ. अरुण पाटील, परांजपे मोतीवाले हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. भाऊ कांबळे, रजिस्ट्रार श्री. खेडेकर, पी.आर.ओ. श्री. चोगले, आनंदराव पवार महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. अरुणा सोमण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. वैष्णवी हळदे हिने केले.
