शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूण शहर कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक
- by Yogesh Bandagale
- January 10, 2026
- 568 views
चिपळूण : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूण शहर कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आज शिक्षक पतपेढीच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये पार पडली. या बैठकीस क्षेत्रप्रमुख श्री. महादेव उर्फ बाळा कदम, तालुकाप्रमुख श्री. बळीराम गुजर, शहरप्रमुख सचिन उर्फ भैया कदम, तालुका संघटक श्री. राजू देवळेकर, महिला शहर संघटिका सौ. वैशाली शिंदे तसेच युवासेना शहर अधिकारी श्री. पार्थ जागुष्टे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या बैठकीत चिपळूण नगर परिषदेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व शहर कार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीदरम्यान सखोल आत्मचिंतन करण्यात आले. पदाधिकाऱ्यांनी आपापली मते मांडत संघटनात्मक त्रुटी, भविष्यातील आव्हाने आणि आवश्यक सुधारणा यावर सविस्तर चर्चा केली. चिपळूणच्या नागरिकांसाठी संघर्ष कायम ठेवत संघटना अधिक बळकट करून एकजुटीने पुढील वाटचाल करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
यावेळी क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, शहरप्रमुख भैया कदम आणि तालुका संघटक राजू देवळेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत संघटनात्मक बांधणी, जनतेशी थेट संपर्क आणि स्थानिक प्रश्नांवर सातत्याने लढा देण्याचे आवाहन केले.
बैठकीदरम्यान गटप्रमुख श्री. मिथिलेश उर्फ विकी नरळकर यांनी, ज्या प्रभागांमध्ये पक्षाचे नगरसेवक नाहीत त्या भागांतील समस्याही पदाधिकाऱ्यांनी आपल्या निदर्शनास आणाव्यात. त्या प्रश्नांमध्ये आपण स्वतः लक्ष घालून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
बैठकीच्या शेवटी पाचही नवनिर्वाचित नगरसेवकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच चिपळूणच्या नागरिकांच्या प्राथमिक गरजा, न्याय व हक्कांसाठी सातत्याने लढण्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
