रिगल एज्युकेशन सोसायटी चिपळूणचे अध्यक्ष संजय शिर्के यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
- by Yogesh Bandagale
- January 02, 2026
- 64 views
चिपळूण (प्रतिनिधी): रिगल एज्युकेशन सोसायटी, चिपळूणचे अध्यक्ष तथा कोकण आयडॉल संजय शिर्के यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल “शिक्षण विकासासाठी उत्कृष्ट नेतृत्व पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
आर्थिक व सामाजिक विकास प्रतिष्ठान, नवी दिल्ली (Economic and Social Development Foundation) यांच्या वतीने देण्यात येणारा हा राष्ट्रीय पुरस्कार शिक्षण क्षेत्रातील भरीव व प्रेरणादायी कार्यासाठी प्रदान करण्यात आला आहे. देशाची खेडी समृद्ध झाली, तर देश आपोआप समृद्ध होईल या दूरदृष्टीतून संजय शिर्के यांनी ग्रामीण भागातील युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी समताधिष्ठित व्यावसायिक शिक्षण प्रणालीची मुहूर्तमेढ रोवली. या शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून आज हजारो विद्यार्थी देश-विदेशात विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाची रिगल भरारी घेत आहेत.
विद्यार्थी व समाज यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले हे अनमोल कार्य केवळ शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन ठरले असून अनेकांसाठी ते प्रेरणादायी ठरत आहे.
हा राष्ट्रीय सन्मान सोहळा नुकताच देशाची राजधानी नवी दिल्ली येथे विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात एच. एस. रावत यांच्या शुभहस्ते संजय शिर्के यांना उत्कृष्टतेचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या राष्ट्रीय पुरस्कारामुळे रिगलरूपी कोकण विभागाच्या शैक्षणिक कार्याला नवी ओळख मिळाली असून, असंख्य कुटुंबांचे आधारवड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय शिर्के यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनांचा वर्षाव होत आहे.
या गौरवाबद्दल यशवंत शिक्षण संस्था, भोम व रिगल एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने संचालिका डॉ. सुमिता शिर्के, सचिव प्रशांत शिर्के, सर्व संचालक मंडळ, शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, शिक्षणप्रेमी व मित्रपरिवार यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
रिगलचे समाजघडणीसाठीचे कार्य राष्ट्रीय स्तरावर गौरवले जाणे हे संपूर्ण कोकणवासियांसाठी अभिमानास्पद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
