मुंबई–गोवा महामार्गाबाबत गडकरींची लोकसभेत मोठी घोषणा

नवी दिल्ली : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई–गोवा महामार्गाबाबत अखेर केंद्र सरकारकडून स्पष्ट वेळापत्रक जाहीर झाले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत सांगितले की, या महामार्गाचे ८९.२९ टक्के काम पूर्ण झाले असून एप्रिल २०२६ पर्यंत संपूर्ण महामार्ग कार्यान्वित होईल.

हिवाळी अधिवेशनातील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुंबई–गोवा महामार्गातील प्रचंड विलंबाबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना गडकरींनी ही महत्त्वाची माहिती दिली. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे–कोल्हापूर या मार्गाविषयी विचारणा केली, तर काँग्रेसच्या खासदार शोभा बच्छाव यांनी धुळे–पिंपळगाव महामार्गाबाबत प्रश्न विचारला. या तिन्ही मार्गांबाबत गडकरींनी सविस्तर स्पष्टीकरण दिले.

मुंबई–गोवा महामार्ग : १५ वर्षांची प्रतीक्षा संपत चालली

“मुंबई–गोवा रस्ता २००९ मध्ये सुरू झाला. मागील सरकारच्या काळात काम सुरू झालं, पण कंत्राटदार बदल, जमीन अधिग्रहणातील अडथळे, तांत्रिक विलंब यामुळे काम पुन्हा पुन्हा अडकलं,” असे गडकरी यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले,
“आत्तापर्यंत ८९.२९% काम पूर्ण झाले आहे. एप्रिल २०२६ च्या आत हा रस्ता पूर्ण करण्यात येईल. यात कोणतीही दिरंगाई होणार नाही.”

मुंबई–गोवा पट्ट्यातील नागरिकांसाठी हा महामार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. रस्ता पूर्ण झाल्यानंतर मुंबई–गोवा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुकर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संबंधित लेख