रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण खुल्या गटासाठी राखीव

चिपळूण | प्रतिनिधी : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या जानेवारी अखेरपर्यंत पार पाडाव्यात, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आल्यानंतर राज्य सरकारने निवडणूक प्रक्रियेची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाची राज्यभरात घोषणा करण्यात आली.

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात आली. या आरक्षण प्रक्रियेकडे संपूर्ण राज्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय इच्छुक, लोकप्रतिनिधी आणि पक्षकार्यकर्त्यांचे लक्ष केंद्रीत झाले होते. नगराध्यक्ष पद कोणत्या प्रवर्गाकडे जाणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

रत्नागिरी जिल्ह्यातील नगराध्यक्ष पदांचे आरक्षण पुढीलप्रमाणे जाहीर झाले आहे :

  • रत्नागिरी नगर परिषद – खुल्या गटातील महिला

  • चिपळूण नगर परिषद – सर्वसाधारण खुला गट

  • खेड नगर परिषद – खुल्या गटातील महिला

  • राजापूर नगर परिषद – खुल्या गटातील महिला

  • गुहागर नगर पंचायत – खुल्या गटातील महिला

  • दापोली नगर पंचायत – सर्वसाधारण खुला गट

  • देवरुख नगर पंचायत – खुल्या गटातील महिला

  • लांजा नगर पंचायत – खुल्या गटातील महिला

  • मंडणगड नगर पंचायत – खुल्या गटातील महिला

या निकालानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश नगराध्यक्ष पदे महिला प्रवर्गासाठी राखीव ठरली असून चिपळूण व दापोली नगरपरिषदा खुल्या गटासाठी खुल्या राहिल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी पुरुष उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे.

राज्यभरात एकूण २४७ नगर परिषदांमधील नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले असून लवकरच संबंधित संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

संबंधित लेख