महाराष्ट्रातील पहिले महिलांनी सादर केलेले नमन २५ ऑक्टोबरला चिपळूणमध्ये
- by Yogesh Bandagale
- October 21, 2025
- 129 views
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य आणि अध्यात्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ‘आभार सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, रत्नागिरी’ या संस्थेने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे.
या मंडळाने महाराष्ट्रातील महिलांचे पहिले नमन रंगभूमीवर आणले असून, कोकणच्या पारंपरिक नमन कलेचे जतन करण्याचा हा अभिनव प्रयत्न संपूर्ण राज्यात कौतुकास्पद ठरत आहे.
हा उपक्रम कोकणातील सांस्कृतिक वारशाला नवी दिशा देणारा ठरत असून, “महिलाही चूल-मूल सांभाळतानाच पुरुषांच्या बरोबरीने कलाक्षेत्रात आपला ठसा उमटवू शकतात” हा संदेश या नमनातून दिला जात आहे.
वय वर्षे १५ ते ७२ या विविध वयोगटातील महिलांनी या नमनात सहभाग घेतला आहे. त्यांची जिद्द, निष्ठा आणि सांस्कृतिक बांधिलकी पाहता हे नमन सादरीकरण म्हणजे जणू एक सांस्कृतिक शिवधनुष्य उचलण्यासारखे कार्य ठरले आहे.
या महिलांच्या नमनाचा विशेष कार्यक्रम शनिवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी सायं. ५ वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे आयोजित करण्यात आला आहे.
या नमनाचे लेखक-दिग्दर्शक नमनसम्राट यशवंत वाकडे, निर्माता साईनाथ नागवेकर, आणि आभार मंडळाचे अध्यक्ष विनोद हळदवणेकर आहेत.
विशेष सहाय्य दादा वाडेकर, शरद गोळपकर, मदन डोर्लेकर (गुरूजी), वसंत घडशी, सूत्रधार वासुदेव वाघे आणि सागर मायगडे यांनी केले आहे.
गीतलेखन सौ. सर्वता चव्हाण यांनी केले असून, मुख्य गायिका म्हणून सौ. आकांक्षा वायंगणकर, सौ. सर्वता चव्हाण आणि सौ. वेदा शेट्ये यांनी आवाज दिला आहे.
या नमनातील प्रमुख कलाकारांमध्ये —
सौ. प्रेरणा विलणकर, ज्योती कदम, सौ. रेश्मा शिंदे, सौ. पूनम गोळपकर, सौ. अर्चना मयेकर, रेखा खातू, सौ. विनया काळप, मनस्वी साळवी, सौ. रिमा देसाई, सौ. गीता भागवत, पूर्वा चव्हाण, सौ. समिक्षा वालम, सौ. आकांक्षा वायंगणकर, सौ. तन्वी नागवेकर, सौ. शीतल सकपाळ, जुई पावसकर, शोभना वरवटकर, शमिका विलणकर, सौ. वेदा प्रकाश शेट्ये, माधवी पाटील, स्वीटी पावसकर आणि निधी वरवटकर यांचा समावेश आहे.
नेपथ्य रचना बाबा आग्रे (लांजा) यांनी केली आहे.
या महिलांनी सादर केलेला हा नमन प्रयोग केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नसून कोकणातील स्त्रीशक्तीचा उत्सव ठरत आहे.
संस्थेच्या या उपक्रमाचे राज्यभरातून कौतुक होत असून, चिपळूणमधील हा ऐतिहासिक कार्यक्रम रसिकांनी अवश्य पाहावा आणि या सर्व महिला कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
