श्री स्वामी चैतन्य परिवार आयोजित कीर्तनमाला–२०२६ ची तयारी सुरू

चिपळूण, दि. २० : श्री स्वामी चैतन्य परिवार आयोजित जानेवारी २०२६ मधील बहुप्रतीक्षित कीर्तनमालेच्या तयारीचा शुभारंभ नुकताच पार पडला. आयोजक परिवाराचे श्रद्धास्थान असलेले सद्गुरू निवास तसेच चिपळूण शहरातील आराध्य दैवतांना विधीपूर्वक निमंत्रण देऊन या कीर्तनमालेच्या तयारीस सुरुवात करण्यात आली.

इंग्रजी नववर्षाचा प्रारंभ करणारा जानेवारी महिना, चिपळूण शहर आणि कीर्तनमाला असे समीकरण गेली नऊ वर्षे दृढ झाले आहे. श्री स्वामी चैतन्य परिवाराच्या शिस्तबद्ध आणि नेटक्या आयोजनामुळे रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या या कीर्तनमालेचे येत्या वर्षी दहावे वर्ष आहे.

सोमवार दि. १२ जानेवारी ते शुक्रवार दि. १६ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित या दहाव्या कीर्तनमालेचा विषय आहे — ‘पेशवाईचा सुवर्णकाळ’. गेली नऊ वर्षे रसिकांचे भरभरून प्रेम लाभलेली ही कीर्तनमाला यंदाही चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे होणार आहे. दररोज सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० या वेळेत कीर्तनमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कीर्तनमालेचे उद्घाटन सोमवार, दि. १२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता संतसाहित्याचे गाढे अभ्यासक श्री. धनंजय चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या कीर्तनमालेचे विशेष आकर्षण म्हणजे राष्ट्रीय कीर्तनकार, विद्यावाचस्पती ह.भ.प. श्री. चारूदत्तबुवा आफळे यांचे अभ्यासपूर्ण, ओघवते आणि प्रभावी कीर्तन. त्यांच्या अमोघ वाणीला सुश्राव्य संगीत साथीदारांची नेटकी साथ लाभते. विषयाला साजेसे रंगमंच नेपथ्य, अनुरूप वातावरणनिर्मिती आणि विनामूल्य प्रवेश यामुळे ही कीर्तनमाला गेली नऊ वर्षे रसिकांसाठी अविस्मरणीय ठरत आली आहे.

चिपळूण येथील बापट आळीतील श्री स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम उपासक, परमपूज्य सद्गुरू वासुदेव दळवीकाका महाराज यांच्या आशीर्वादाने ही कीर्तनमाला साकारत असून, भारतीय संस्कृतीच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचे विविध पैलू ह.भ.प. चारूदत्तबुवा आफळे आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनातून उलगडत असतात.

गेल्या तीन वर्षांच्या कीर्तनमालांमध्ये शिवचरित्र, छत्रपती संभाजीराजांची शौर्यगाथा, त्यानंतर स्वराज्य टिकवून ठेवणारे छत्रपती राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज, बाळाजी विश्वनाथ पेशवे आणि बाजीराव पेशवे यांच्या झुंजार कारकीर्दीचा सखोल मागोवा घेण्यात आला. मराठेशाहीच्या इतिहासाचा हा प्रवास यंदा ‘पेशवाईचा सुवर्णकाळ’ या विषयातून रसिकांना अनुभवता येणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही कीर्तनमालेस विनामूल्य प्रवेश असून, आसन व्यवस्थेतील पहिल्या काही रांगा विशेष अतिथी व आयोजक परिवारासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या जागेची मर्यादा लक्षात घेता रसिकांनी कार्यक्रमाच्या नियोजित वेळेत उपस्थित राहून विनामूल्य आसन व्यवस्थेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक श्री स्वामी चैतन्य परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित लेख