मनसेतून हकालपट्टी केलेले वैभव खेडेकर भाजपमध्ये दाखल, तीन वेळा रखडलेला पक्षप्रवेश अखेर पार पडला!
- by Yogesh Bandagale
- October 14, 2025
- 19 views
मुंबई : कोकणातील मनसेचे माजी नेते आणि खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी अखेर भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी खेडेकर यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनीही कमळ हाती घेतलं, ज्यामुळे कोकणातील भाजपची ताकद अधिक वाढली आहे.
वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश गेल्या काही महिन्यांपासून रखडला होता. तब्बल तीन वेळा पक्षप्रवेशाचा मुहूर्त पुढे ढकलला गेला होता. प्रत्येकवेळी काही ना काही कारणांमुळे समारंभ रद्द किंवा पुढे ढकलण्यात आला, त्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर आज त्यांच्या प्रवेशाने त्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
खेडेकर हे मनसेचे जुने आणि कोकणातील प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची प्रतिमा होती. मात्र अलीकडच्या काळात त्यांची भाजप आणि शिंदे गटाशी जवळीक वाढत गेली. त्यानंतर मनसेने त्यांच्यावर कारवाई करत पक्षातून बडतर्फ केले होते.
भाजप प्रवेश लांबत असल्याने खेडेकर स्वतः मुंबईत येऊन रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर यांच्यासह पक्ष नेत्यांची भेट घेत होते. शेवटी आज अखेर त्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला.
राजकीय वर्तुळात या प्रवेशाकडे केवळ वैभव खेडेकर यांचे वैयक्तिक पुनरागमन म्हणून न पाहता, कोकणात भाजपची घडी मजबूत करण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून पाहिले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला विशेष महत्त्व मिळत आहे.
भाजप प्रवेशानंतर एबीपी माझाशी बोलताना वैभव खेडेकर म्हणाले, पक्षप्रवेश कोणी रखडवला हे एका बाईटमध्ये सांगण्यासारखं नाही. माझी सविस्तर मुलाखत घ्या, मी नक्की सांगेन. मात्र आज तो दिवस नाही. माझ्या देवाने स्वत:पासून दूर केलं, काही कारणं झाली असतील पण दुरावा निर्माण झाल्याचं दुःख आहे. आता जोमाने भाजप वाढवण्यावर आमचा भर असेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शतप्रतिशत भाजप करण्याचं आमचं लक्ष्य आहे.”
त्यांनी पुढे म्हटलं की, “मनसेतील अनेक नेत्यांसोबत भावनिक नाती होती, ती आज थांबत आहेत याचं दुःख आहे; पण भाजपनं मला आपलंसं केलं, याचा आनंदही वाटतो.”
