मुंबई महापालिका निवडणुकीत कोकणाचा भावनिक सहभाग

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवारांच्या प्रचारात रत्नागिरी-सिंधुदुर्गचा ठसा

रत्नागिरी : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबईस्थित उमेदवारांच्या प्रचारात कोकणचा भावनिक आणि सक्रिय सहभाग पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्हाप्रमुख श्री. दत्ता कदम तसेच जिल्हा समन्वयक व उपजिल्हाप्रमुख श्री. रविंद्र डोळस यांनी या उमेदवारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आणि प्रचारात सहभागी होत कोकणचा ठाम पाठिंबा दर्शवला.

या प्रचार दौऱ्यात मालाड प्रभागातील सुहास वाडकर, जोगेश्वरी (पूर्व) प्रभाग क्र. ७९ मधील सौ. मानसी मधुकर जुवाटकर, सांताक्रूज (पूर्व) प्रभाग क्र. ८९ मधील गितेश विनायक राऊत, वाडाळा-प्रतीक्षा नगर प्रभाग क्र. १७३ मधील श्रीमती प्रणिता प्रकाश वाघधरे, चेंबूर-मानखुर्द प्रभाग क्र. १३५ मधील सौ. समीक्षा सक्रे, धारावी (पश्चिम) प्रभाग क्र. १८४ मधील सौ. वर्षा वसंत नकाशे, शिवडी-राम टेकडी प्रभाग क्र. २०६ मधील श्री सचिन पडवळ, दादर-हिंदमाता प्रभाग क्र. २०० मधील सौ. ऊर्मिला उल्हास पांचाळ, परेल-लालबाग प्रभाग क्र. २०३ मधील सौ. भारती पेडणेकर, परेल प्रभाग क्र. २०४ मधील किरण तावडे, प्रभाग क्र. २० मधील सौ. संपदा वैभव मयेकर, विक्रोळी-पार्क साईड प्रभाग क्र. १२३ मधील श्री सुनील मोरे यांच्यासह अंकित प्रभू (गोरेगाव), निशिकांत शिंदे (माहीम) आणि विजय भारंगे (वरळी) यांचा समावेश आहे.

या वेळी जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देत, जिल्ह्यातील प्रत्येक शिवसैनिकाने आपल्या मुंबईस्थित नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांपर्यंत पोहोचून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या सर्व अधिकृत उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आवाहन केले.

पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी कोकणावर टाकलेला विश्वास कोकणवासीयांच्या एकजुटीतून, निष्ठेतून आणि ताकदीतून सार्थ ठरवण्याची हीच वेळ असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबईतही कोकणचा स्वाभिमान आणि शिवसेनेची मशाल दिमाखात फडकली पाहिजे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

मुंबईत वास्तव्यास असतानाही कोकणाची माती, संस्कार आणि ठाकरे विचार जपणाऱ्या या उमेदवारांच्या पाठीशी कोकणवासीयांची भक्कम ताकद उभी असल्याचे या प्रचार दौऱ्यातून स्पष्ट झाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि कोकण यांचे नाते केवळ राजकीय नसून रक्ताच्या नात्यासारखे घट्ट असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

संबंधित लेख