मतमोजणीदिवशी बहादुरशेख नाका–चिंचनाका रोड वाहतुकीस बंद
- by Yogesh Bandagale
- December 17, 2025
- 203 views
रत्नागिरी, दि. १७ (जिमाका) : चिपळूण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची मतमोजणी प्रक्रिया रविवार, दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी गुरुदक्षिणा हॉल, युनायटेड हायस्कूल, मार्कडी, चिपळूण येथे पार पडणार आहे. मतमोजणीच्या दिवशी होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बहादुरशेख नाका ते चिंचनाका आणि चिंचनाका ते बहादुरशेख नाका हा मार्ग सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
बंद करण्यात आलेल्या मार्गासाठी बहादुरशेख नाका–पावर हाऊस–चिंचनाका तसेच चिंचनाका–पावर हाऊस–बहादुरशेख नाका हे पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जारी केले आहेत.
चिपळूण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान दि. २ डिसेंबर २०२५ रोजी पार पडले असून मतमोजणीच्या वेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवणे आवश्यक असल्याने ही वाहतूक नियंत्रण व्यवस्था लागू करण्यात आली आहे.
हे आदेश महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३४ तसेच मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ व ११६ (१)(अ)(ब) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जारी करण्यात आले आहेत.
तथापि, ही अधिसूचना पोलीस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, शासकीय वाहने तसेच मा. मंत्री महोदयांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने पोलिसांनी परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही. अत्यावश्यक व निकडीच्या प्रसंगी संबंधित ठिकाणी तैनात असलेले पोलीस अधिकारी आवश्यक तो निर्णय घेऊ शकतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
