बालसंरक्षण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक : जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे
- by Yogesh Bandagale
- December 17, 2025
- 27 views
चिपळूण : बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी अनुकूल वातावरण व अद्ययावत शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. तसेच लैंगिक छळवणूक व पोर्नोग्राफीसारख्या गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा (पॉक्सो) २०१२ हा सर्वसमावेशक कायदा असून, वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्याची काटेकोर अंमलबजावणी व सर्व यंत्रणांची सतर्कता आवश्यक आहे, असे मार्गदर्शन जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी केले.
तालुका विधी सेवा समिती व चिपळूण वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूण येथील युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये बालसंरक्षण कायद्याविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना डॉ. नेवसे यांनी बालकांवरील अन्याय व महिलांवरील अत्याचार या विषयांवर सविस्तर माहिती दिली.
डॉ. नेवसे म्हणाल्या की, सध्याच्या काळात भारतात लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ दिसून येत आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार देशातील सुमारे २४ टक्के बालकांना अशा प्रकारच्या अत्याचारांचा सामना करावा लागत असून, बहुतेक प्रकरणांत हे गुन्हे ओळखीच्या अथवा विश्वासातील प्रौढांकडून घडतात. या पार्श्वभूमीवर पॉक्सो कायद्याअंतर्गत बालकांचे संरक्षण करण्यासाठी कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत.
या कायद्यानुसार गंभीर गुन्ह्यांसाठी सुधारित कलम ६ अंतर्गत दोषी आढळलेल्या गुन्हेगारास जन्मठेप अथवा फाशीपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. पीडित बालकाचे नाव गोपनीय ठेवले जाते. महिला पोलीस अधिकारी साध्या वेशात पीडितेच्या घरी जाऊन तक्रार नोंदवू शकतात. तसेच खटल्याच्या सुनावणीदरम्यान फिर्यादी व आरोपी समोरासमोर येणार नाहीत, याचीही न्यायालयीन काळजी घेतली जाते.
बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी पालक, शिक्षक व समाजाने जागरूक राहणे आवश्यक असल्याचे नमूद करत डॉ. नेवसे म्हणाल्या की, आजची मुले उद्याचे नागरिक आहेत. सुदृढ समाजनिर्मितीसाठी शाळेमधून चांगले संस्कार घडविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पीडित बालकाला न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षक व पालकांची भूमिका मोलाची आहे.
कार्यक्रमावेळी चिपळूण वकील संघाच्या उपाध्यक्ष अॅड. नयना पवार, संस्थेचे संचालक सुनील जोशी, प्राचार्य श्री. वाचासिद्धी, शिक्षकवर्ग व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन तालुका विधी सेवा समितीच्या वरिष्ठ लिपिक श्रीमती सुर्वे, कनिष्ठ लिपिक श्री. जुगधर तसेच शिपाई श्री. मस्के व श्री. इंगळे यांनी केले.
