देवरुखातील मोडीलिपीचे अभ्यासक बाळूनाना बोंद्रे यांचे वृद्धापकाळाने निधन
- by Yogesh Bandagale
- December 08, 2025
- 110 views
देवरूख (सुरेश सप्रे ): देवरूखातील जुना काळ, जुन्या लोकरीती, महसूल विभागाची कार्यप्रणाली आणि सर्वात महत्त्वाची मोडीलिपी– या सर्वांचा जिवंत दुवा म्हणून ओळखले जाणारे आत्माराम (बाळू नाना) यशवंत बोंद्रे (वय 92) यांचे रविवारी (7 डिसेंबर 2025) पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने मोडीलिपी जाणकार, महसूल क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्व आणि जनसंपर्काची परंपरा असलेली दुर्मीळ पिढी हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
साधेपणा आणि सेवाभावाचे मूर्तिमंत रूप
पांढरा शर्ट-लेंगा, तोंडात साधी सुपारी, चेहऱ्यावर हसू, मृदू शब्द आणि माणसे जोडण्याची विलक्षण आवड—यामुळे बाळूनाना सर्वांच्या लाडके होते. महसूल विभागातील कामकाजाची सखोल जाण आणि मोडीलिपीवरील प्रभुत्वामुळे ते तालुक्यातील अनेकांसाठी मार्गदर्शक ठरले.
नोकरीसोबत शेती आणि उपजीविकेची कष्टाची साधने
तलाठी म्हणून काम करत असतानाही शेती, कुटुंबाचा सांभाळ आणि विविध पूरक व्यवसाय त्यांनी चिकाटीने सांभाळले. विमा, पोस्ट, लॉटरी तिकीटांची एजन्सी, केसगळतीवरील तेल, घरची शिकेकाई, गावठी हळद-तिखट, स्वतःच्या शेतातील भाज्या – मेहनत, मितव्यय आणि सातत्य या मूल्यांचा त्यांनी आयुष्यभर अंगिकार केला.
संपूर्ण जिल्ह्याच्या वंशावळीसारखा असलेला जनसंपर्क
रत्नागिरी–सिंधुदुर्गमधील असंख्य गावांची त्यांना इतकी जवळून ओळख होती की अनेक घराण्यांच्या वंशावळी त्यांना पाठ असायच्या. 1950 पासून प्राथमिक शिक्षक, त्यानंतर खेड तालुक्यापासून सावंतवाडीपर्यंत जवळपास 75 गावांमध्ये तलाठी म्हणून सेवा—असा त्यांचा प्रदीर्घ प्रवास राहिला.
अशा दस्तऐवजांचे अचूक भाषांतर करून त्यांनी असंख्य नागरिकांची जात पडताळणी, वंशावळ, जमीन हक्क, न्यायालयीन पुरावे अशा अनेक अडचणी सोडवल्या. 250 वर्षे जुने मोडी दस्तऐवज वाचून देण्याचा दुर्मीळ अनुभव त्यांच्याकडे होता.
अचूकता, शब्दांचे अर्थ उलगडण्याची कौशल्यपूर्ण हातोटी
जुन्या पद्धतीची काटेकोर मांडणी, मोत्यासारखे अक्षर आणि शब्दांचे अर्थ नेमके सांगण्याची क्षमता—ही त्यांची खास ओळख. तरीही आपल्या कलेचा गर्व न बाळगता त्यांनी केलेले कार्य केवळ "सेवाभाव" म्हणूनच केले.
जमिनींचे 7/12 आयुष्यभर काढणारा… पण स्वतः 7/12 तारखेलाच कायमचा निघून गेला
लोकांच्या जमिनींच्या नोंदी आयुष्यभर काढणारा हा कष्टकरी, विद्वान आणि संवेदनशील माणूस योगायोगाने 7 डिसेंबर (7/12) रोजीच या संसारातून निघून गेला—याचे विशेष हळहळजनक औचित्य सर्वत्र बोलले जात आहे.
पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या जाण्याने मोडीलिपीचा एक चालता-बोलता ग्रंथ हरपला आहे.
