भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते श्रीकांत उर्फ कांता भागवत यांचे निधन
- by Yogesh Bandagale
- October 16, 2025
- 115 views
देवरूख : देवरूख शहरातील ज्येष्ठ व्यावसायिक आणि भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते श्रीकांत उर्फ कांता शशिकांत भागवत यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते वयाच्या ५५व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने देवरूख शहरासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कांता भागवत यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर थेट राजकारणात पाऊल ठेवले. विद्यार्थी अवस्थेत असतानाच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत राहून सामाजिक कार्याचा पाया घातला होता. पुढे ते भाजपात सक्रिय झाले आणि गेली तीन दशके पक्षनिष्ठा आणि प्रामाणिकतेने काम केले.
व्यवसाय आणि समाजकारण यांचा सुंदर मेळ घालत भागवत यांनी वाळू, खडी आणि फाडी व्यवसायातून स्वतःचे साम्राज्य उभे केले, मात्र त्यातही त्यांनी गरजूंना अल्प दरात साहित्य उपलब्ध करून दिले. त्यांच्या ताब्यात तीन ट्रक असून, हा व्यवसाय त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे सांभाळला. समाजकारणात सक्रिय असताना देखील त्यांनी व्यवसायातून मिळवलेला पैसा पक्ष उभारणीसाठी वापरला, हे त्यांच्या कार्यनिष्ठेचे उदाहरण ठरले.
भाजप विरोधी पक्षात असतानाच्या काळात, पक्षाला संघटित ठेवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी भागवत यांनी स्वतःच्या खर्चाने प्रचार आणि संघटनात्मक कार्यक्रम आयोजित केले. त्यांच्या सडेतोड आणि स्पष्टवक्तेपणामुळे ते पक्षात आदराचे मानकरी ठरले होते. जे पटत नसेल ते निर्भीडपणे सांगण्याची सवय त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली.
प्रत्येक निवडणुकीच्या काळात ते भाजप आणि युतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी रात्रंदिवस मेहनत घेत असत. त्यामुळे त्यांना भाजप परिवारातील आधारस्तंभ मानले जात होते.
अलीकडील काळात त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना सांगली येथे हलवण्यात आले, मात्र यकृत निकामी झाल्यामुळे शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
शनिवारी सायंकाळी त्यांचा पार्थिव देह कांजीवरा येथील निवासस्थानी आणण्यात आला. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे नेते, व्यावसायिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून श्रद्धांजली वाहिली.
रात्री उशिरा चर्मालय स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने देवरूखने एक समर्पित कार्यकर्ता आणि उदार मनाचा समाजसेवक गमावला आहे, अशी भावना भाजपामध्ये व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
