दहापेक्षा अधिक वाहनांच्या ताफ्यास मनाई
- by Yogesh Bandagale
- November 06, 2025
- 75 views
रत्नागिरी (जिमाका): नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक प्रचारादरम्यान कोणत्याही वाहनांच्या ताफ्यात दहापेक्षा अधिक मोटारगाड्या अथवा वाहनांचा वापर करण्यास जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी निर्बंध लावले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आयोगाच्या निर्देशानुसार सुरक्षाविषयक कारणास्तव कोणत्याही परिस्थितीत ताफ्यातील वाहनांची संख्या दहापेक्षा जास्त राहू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडावी, या हेतूने राजकीय पक्ष, उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी दहा वाहनांच्या मर्यादेचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अंतर्गत जिल्हादंडाधिकार्यांना प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी करण्यात आला आहे. आचारसंहिता कालावधीत या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे आदेशात नमूद आहे.
प्रत्येक नागरिकापर्यंत आदेशाची माहिती पोहोचविण्यासाठी पोलीस विभागाने ध्वनीक्षेपकाद्वारे जाहीरात करावी आणि प्रसारमाध्यमांनी त्यास प्रसिद्धी द्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
