आकले ग्रामस्थांच्या न्यायासाठी शिवसेनेचे निवेदन
- by Yogesh Bandagale
- April 22, 2026
- 94 views
चिपळूण, दि. २२ एप्रिल : चिपळूण तालुक्यातील मौजे आकले येथील ग्रामस्थांच्या खाजगी जमिनीत वन विभागाच्या नावाखाली कथित बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या वतीने आक्रमक भूमिका घेत संबंधित प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले.
तालुकाध्यक्ष बळीराम गुजर यांच्या नेतृत्वाखाली मा. तहसीलदार, विभागीय वन अधिकारी तसेच आलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी शहर प्रमुख सचिन उर्फ भैया कदम, उपशहर प्रमुख संजय रेडीज व राजू विखारे, शहर सचिव प्रशांत मुळये, विभाग प्रमुख गणेश फके व संतोष मिरगल, तसेच तालुका प्रसिद्धीप्रमुख सचिन चोरगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनानुसार, मौजे आकले येथील अनेक ग्रामस्थांच्या गट क्रमांकातील खाजगी जमिनीत वन विभागाच्या गट क्रमांक १०२४ च्या फेन्सिंग कामाच्या निमित्ताने सिमेंटचे खांब रोवून तार ओढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत ग्रामस्थांनी २४ मार्च २०२६ रोजी तहसील कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र त्यावर कार्यवाही न झाल्याने शिवसेनेच्या माध्यमातून हा प्रश्न पुन्हा उपस्थित करण्यात आला.
निवेदनात सदर प्रकरणी तात्काळ अधिकृत सरकारी मोजणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मोजणीदरम्यान संबंधित ग्रामस्थ, महसूल व वन विभागाचे अधिकारी उपस्थित ठेवून पंचनामा करावा, तसेच अतिक्रमण सिद्ध झाल्यास संबंधित सिमेंट खांब व फेन्सिंग काढून टाकून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, नायब तहसीलदार यांनी संबंधितांशी सविस्तर चर्चा करून प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत लवकरात लवकर मोजणी करण्याचे आदेश दिले असून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
उपविभागीय वन अधिकाऱ्यांनीही स्पष्ट केले की, डिसेंबर २०२५ मधील फेरफारानुसार वनक्षेत्र मोजणीचे काम Lloyds Metals and Energy Limited या खाजगी कंपनीकडे सोपविण्यात आले असून प्रत्यक्ष खांब उभारणीचे कामही संबंधित कंपनीमार्फत करण्यात आले आहे. तरीही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवून सर्व संबंधितांच्या उपस्थितीत मोजणी करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी महादेव भिकू गजमल, बारकू गंगाराम वनगे, जयवंत विठोबा वनगे, हनुमंत विठोबा जोशी, दत्ताराम सिताराम गोरखे, शंकर सोनू उदेग, संजय शिवराम जोशी, आत्माराम महादेव जोशी व रविंद्र कृष्णा कदम हे प्रभावित ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, मागण्यांवर समाधानकारक कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
