मराठी भाषेच्या जतनासाठी नगर परिषद कटिबद्ध: नगराध्यक्ष

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या वतीने लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय यांच्या सहकार्याने इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात काव्यवाचन स्पर्धा, कथाकथन तसेच साहित्यिक सन्मान उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या हस्ते संविधान व ग्रंथपूजनाने झाले, तर मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले.

या वेळी बोलताना नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी मराठी भाषेची महती अधोरेखित केली. “मराठी ही केवळ भाषा नसून आपली ओळख, संस्कृती आणि परंपरेचा पाया आहे. मराठी भाषेचे जतन व संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. मराठी भाषेसाठी जे जे सहकार्य लागेल ते नगर परिषदेच्या, तसेच शिवसेनेच्या माध्यमातून नक्कीच केले जाईल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच राज्याचे मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचे मराठी भाषा टिकावी व वाढावी, यासाठी सातत्याने मार्गदर्शन लाभत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुख्याधिकारी संजय जाधव यांनी मराठी भाषेचे वैभव सांगताना, “मराठी भाषेत सर्व स्वर आहेत, त्यामुळे तिची समृद्धी अधिक आहे,” असे सांगितले. कवी अरुण इंगवले यांनी मराठी भाषेचे जागतिक स्थान स्पष्ट करताना जगात मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या अकराव्या क्रमांकावर असल्याचे नमूद केले आणि कुसुमाग्रज यांची थोडक्यात माहिती दिली.

काव्यवाचन स्पर्धेत एकूण १५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. सुहास बारटक्के, प्रा. सोनाली खर्चे व रविंद्र गुरव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पवार यांनी केले.

रविवार, दिनांक १ मार्च रोजी राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते साहित्यिकांचा सन्मान सोहळा पार पडणार आहे.

या कार्यक्रमास शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती हर्षाली पवार, नगरसेवक शशिकांत मोदी, संजय गोताड, नगरसेविका अंजली कदम, नीलम जाधव, पल्लवी महाडिक, उमा देसाई, वैशाली कदम, महिला व बालकल्याण समिती सभापती रसिका देवळेकर, बांधकाम सभापती कपिल शिर्के, अजय भालेकर, उद्यान विभाग प्रमुख बापू साडविलकर, माजी उपनगराध्यक्ष बापू काणे, ऋचा भागवत, प्रा. संतोष गोणबरे, विनायक ओक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, कांता कानिटकर, निहार कोवळे, प्रदीप मोहिते, संदेश पवार, छाया पोटे, अपर्णा नातू, मुजफ्फर सय्यद यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकांत मोदी यांनी केले. कॉलेज जीवनात आपण कविता केल्या बक्षिसे मिळवली असे त्यांनी सांगितले. तसेच नगर पालिकेतील सध्याचे पदाधिकारी व सुरू असलेल्या कारभार यावर त्यांनी कविता सादर केले व उपस्थितांचे दाद मिळवली, तर आभार प्रदीप पवार यांनी मानले.

संबंधित लेख