युनायटेडच्या स्नेहसंमेलनात ‘रंगोत्सव’ कार्यक्रमातून कोकणी लोककलांचा जागर

चिपळूण : शहरातील परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या युनायटेड इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन सध्या उत्साहात सुरू आहे. स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात ‘रंगोत्सव’ हा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना कोकणातील पारंपरिक लोककला, लोकगीतं आणि लोकसंस्कृतीची प्रभावी ओळख करून देण्यात आली.

लोककलावंत व पत्रकार योगेश बांडागळे यांनी ‘कोकणचा साज – संगमेश्वरी बाज’ या लोकनाट्यावर आधारित लोककलांची ओळख करून देणारा सादरीकरणात्मक कार्यक्रम सादर केला. त्यांच्या सादरीकरणाला शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध आणि इंग्रजी विषयाच्या शिक्षिका वैशाली चितळे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष पुढाकार घेतला होता.

या कार्यक्रमास शाळा समितीचे चेअरमन विजय चक्रदेव, संचालक अभय चितळे, मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध, उपमुख्याध्यापक संजय बनसोडे, पर्यवेक्षिका रेवती कारदगे आदी मान्यवर उपस्थित होते. योगेश बांडागळे यांचा परिचय वैशाली चितळे यांनी करून दिला.

योगेश बांडागळे यांनी दहावी ‘अ’ वर्गातील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन या कार्यक्रमाची संपूर्ण रचना केली होती. विद्यार्थ्यांनी जाकडी नमनातील काही भाग सादर करत उपस्थितांची मने जिंकली. इयत्ता सातवी ‘ब’ मधील चैतन्य जोगळे व त्याच्या सहकारी मित्रांनी संगीताची बाजू भक्कमपणे सांभाळत कार्यक्रमाला रंगत आणली.

मुंबईकराच्या भूमिकेत योगेश बांडागळे यांना त्यांचा सुपुत्र, बालकलाकार रुद्र बांडागळे याने चांगली साथ दिली. नमन, जाकडी भजन, लग्नाची गाणी अशा विविध कोकणी लोककला व लोकगीतांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोकणच्या समृद्ध संस्कृतीची ओळख करून देण्यात आली.

गवळणी सादर करणाऱ्या विद्यार्थिनींनी उखाणे सादर करत कार्यक्रमात रंग भरला. वेदिका गुरव हिने सादर केलेल्या “खणखण कुदळी” या भला मोठ्या उखाण्याला प्रेक्षकांकडून विशेष दाद मिळाली आणि तिला ‘वन्स मोअर’ मिळाला. विद्यार्थ्यांचे नृत्य बसवण्याचे काम सौ. समिधा बांडागळे यांनी केले होते.

या रंगोत्सव कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. पारंपरिक लोककलेच्या सादरीकरणामुळे स्नेहसंमेलनाचा दुसरा दिवस विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला.

संबंधित लेख