जिल्ह्याच्या 'शाश्वत विकास ध्येय' प्रगती अहवालाचे प्रकाशन

रत्नागिरी, दि. १ (जिमाका) : संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास ध्येय 2030 (SDG 2030) उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्याचा सन 2015-16 ते 2022-23 या कालावधीतील जिल्हा निर्देशक आराखडा प्रगतीमापन अहवाल आज प्रकाशित करण्यात आला. या अहवालाचे प्रकाशन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक निवास यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, अधीक्षक अभियंता एम. एस. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हास्तरावर शाश्वत विकास ध्येयांच्या अंमलबजावणी आणि प्रगतीचे मापन करण्यासाठी हा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. या अहवालात 17 ध्येयांतील 120 निर्देशकांची सन 2015-16 ते 2022-23 पर्यंतची आकडेवारी समाविष्ट करण्यात आली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्व 193 सदस्य राष्ट्रांनी 25 सप्टेंबर 2015 रोजी झालेल्या 70व्या सर्वसाधारण सभेत ‘शाश्वत विकास ध्येय 2030’ उपक्रम स्वीकारला होता. या उपक्रमांतर्गत 17 शाश्वत विकास ध्येये आणि 169 लक्ष्ये निश्चित करण्यात आली आहेत. या ध्येयांची प्रगती मोजण्यासाठी केंद्रस्तरावर सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत अहवाल प्रसिद्ध केला जातो, तर राज्यस्तरावर आधाररेषा व प्रगतीमापन अहवाल प्रकाशित केला जातो. त्याच धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्याचा प्रगती अहवालही प्रकाशित करण्यात आला आहे.


 

संबंधित लेख