नगर परिषद स्वच्छता मोहीम यशस्वी; माजी आमदार रमेशभाई कदम यांचे कौतुक

 

चिपळूण : कधी काळी कचरा व्यवस्थापनाच्या अडचणीत सापडलेले चिपळूण शहर आज आरोग्यदृष्ट्या आदर्श बनले आहे, आणि याचे सर्व श्रेय नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना जाते, असे गौरवोद्गार माजी आमदार व माजी नगराध्यक्ष रमेशभाई कदम यांनी व्यक्त केले.

चिपळूण नगर परिषद व पूज्य गांधी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गांधारेश्वर येथे महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी रमेशभाई कदम बोलत होते. ते पुढे म्हणाले, “कचरा प्रकल्प उभारण्यात आल्याने शहरात घनकचऱ्याचे व्यवस्थापन सुरळीत झाले असून, नगर परिषद नियमितपणे घरोघरी जाऊन कचरा संकलन करत आहे. हे कार्य कौतुकास्पद आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या अथक मेहनतीमुळेच आज चिपळूणकर नागरिक निरोगी जीवन जगत आहेत.”

ते म्हणाले की, “नगर परिषद स्वच्छतेसाठी सातत्याने प्रयत्न करत आहे, प्लास्टिक मुक्तीच्या लढ्यात देखील आघाडीवर आहे. मात्र काही नागरिक अजूनही रस्त्याच्या कडेला कचरा टाकत असून, अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी,” अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयद्रथ खताते, चिपळूण अर्बन बँकेचे माजी संचालक सतीशअप्पा खेडेकर, नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक होमकळस, सामाजिक कार्यकर्ते सुरेश राऊत, आरोग्य विभागाचे सुजित जाधव, पाणीपुरवठा विभागाचे रोहित खाडे, निवेदक शिक्षक प्रकाश गांधी, सुनील खेडेकर, विवेक रेळेकर, जाफर गोठे आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी परीक्षक हसन मुसा, गिरीराज पांडे, विनायक बांद्रे व शरयू इंदुलकर यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सई वरवटकर व सुनील खेडेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विविध गटांतील निबंध व वक्तृत्व स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. सहभागी शाळांना पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.

विशेष आकर्षण ठरले ते कापरे हायस्कूलच्या चौथीतील विद्यार्थिनी अदिती भुरके हिचे भाषण. तिच्या प्रभावी शब्दांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या अखेरीस लियाकत शहा यांनी आभार मानले.

संबंधित लेख