चिपळूण नगर परिषदेच्या वतीने वर्ग ४ कर्मचाऱ्यांना गणवेश वाटप
- by Yogesh Bandagale
- October 18, 2025
- 128 views
चिपळूण : नगर परिषदेच्या मार्फत वर्ग ४ च्या सर्व कर्मचारीवर्गांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, वाहन विभाग तसेच नगर परिषद कार्यालयातील वर्ग ४ चे सर्व कर्मचारी यांना या वेळी नवीन गणवेश देण्यात आले.
या गणवेश वितरण कार्यक्रमास मुख्याधिकारी विशाल भोसले, अधिकारी मंगेश पेढांबकर, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, वाहन विभाग प्रमुख संतोष शिंदे, बांधकाम मेस्त्री रविकांत सातपुते, नागरी सुविधा केंद्र प्रमुख वलीद वांगडे तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
एकूण ९ महिला कर्मचाऱ्यांना साडीचा गणवेश देण्यात आला, तर ९१ सफाई व शिपाई कर्मचाऱ्यांना नियमित गणवेश वितरित करण्यात आला. सुमारे दोन वर्षांनंतर हे गणवेश वितरण करण्यात आले असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
नगर परिषदेच्या वतीने या उपक्रमाद्वारे कर्मचाऱ्यांच्या कामाचा सन्मान राखत, त्यांच्या सेवाभावाचे कौतुक करण्यात आले. कर्मचारीवर्गात नवचैतन्य निर्माण करून दिवाळीपूर्वी आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र या कार्यक्रमात पाहायला मिळाले.
