चिपळूण ज्येष्ठ नागरिक संघाचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
- by Yogesh Bandagale
- October 30, 2025
- 89 views
चिपळूण (प्रतिनिधी): बुधवार, दि. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी ज्येष्ठ नागरिक संघ, चिपळूणचा मासिक स्नेहमेळावा संघाच्या कार्यालयात अध्यक्ष श्री. उस्मान बांगी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. या वेळी मंचावर उपाध्यक्ष श्री. उदय वेल्हाळ, सचिव सौ. रत्नमाला कळंबटे आणि कोषाध्यक्ष श्री. शांताराम कदम उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत व प्रास्ताविकाने झाली.
यानंतर ऑक्टोबर महिन्यात वाढदिवस असलेल्या सभासदांचा सन्मान करण्यात आला. त्यांना गुलाबपुष्प देऊन औक्षण करण्यात आले आणि केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे संयोजन सौ. नीला पेंडसे, मंजिरी नरवणे आणि वृषाली खाडे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते संघाचे ज्येष्ठ सभासद श्री. शांताराम परशुराम तांबे, वय वर्षे १०१! आजही ते खणखणीत आवाजात बोलतात, स्वतःची कामे स्वतः करतात. त्यांच्या मुलाने श्री. प्रवीण तांबे यांनी त्यांना गुढे येथून आणले. श्री. नंदकुमार तांबे यांनी यासाठी पुढाकार घेतला. तांबे आजोबांचा सत्कार संघाचे अध्यक्ष श्री. उस्मान बांगी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. त्यांचे औक्षण पाच सुवासिनींनी केले.
आपल्या मनोगतात तांबे आजोबा म्हणाले, "तुम्हा सर्वांचं प्रेम बघून मी भारावून गेलो आहे. तुम्हां सर्वांना धन्यवाद." त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या घटनांचा प्रत्यक्ष अनुभव सांगितला — महात्मा गांधींचा मिठाचा सत्याग्रह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा चवदार तळे सत्याग्रह आजही त्यांच्या स्मरणात आहेत.
या कार्यक्रमाला सुमारे ८० सभासद उपस्थित होते. श्री. रत्नाकर थत्ते यांनी शालेय जीवनातील कविता सादर केल्या, तर अपर्णा कांबळे, माधवी भागवत, प्रतिमा चितळे यांनी गाणी गायली. माधुरी मंडपे यांनी चारोळ्या सादर केल्या आणि विजयालक्ष्मी भोसले यांनी नाट्यगीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने सभासदांनी आपापली कला सादर केली.
पूरग्रस्त मदत निधीसाठी सभासदांनी देणगी देऊन सामाजिक बांधिलकी जपली. देणगी देणाऱ्यांमध्ये नथुराम सावरटकर, सुभाष जोशी, विजय सैतवडेकर, विश्वास देवधर, प्रभाकर सुर्वे, सुमन धारप, उज्वला जोशी, धनश्री नाटुस्कर, अपर्णा कांबळे, विजय भागवत, शांताराम कदम यांचा समावेश आहे. ही रक्कम लवकरच मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येणार आहे.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लक्ष्मण कांबळे, बजरंग दाभोळे, अ. गनी वनकर, विजय बापट आणि सुरेश जाधव यांनी परिश्रम घेतले. शेवटी अल्पोपहाराने स्नेहमेळाव्याची सांगता झाली.
