चिपळूणमध्ये प्रथमच कुमार राजयोग धुरी यांचा भक्तीरंग
- by Yogesh Bandagale
- January 31, 2026
- 32 views
लायन्स असोसिएशन व लायन्स क्लब ऑफ चिपळूण यांचा अभंग–नाट्यसंगीत कार्यक्रम
चिपळूण : चिपळूणमधील संगीतप्रेमींसाठी एक अविस्मरणीय संगीत मेजवानी घेऊन कुमार राजयोग धुरी प्रथमच चिपळूणच्या रसिकांसमोर सादर होणार आहेत. लायन्स असोसिएशन व लायन्स क्लब ऑफ चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने अभंग व नाट्यभक्तीसंगीताचा सुरेल संगम असलेल्या ‘भक्तीरंग’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम शनिवार, दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९.३० वाजता, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे होणार आहे.
मराठी संगीत रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ गायक पंडित अजित कडकडे यांचे शिष्य असलेले राजयोग धुरी हे नाट्यसंगीत व अभंगवाणी क्षेत्रातील उदयोन्मुख आणि लोकप्रिय गायक म्हणून ओळखले जातात. अत्यंत अल्पावधीतच त्यांनी आपल्या बहारदार, भावपूर्ण सादरीकरणाने संपूर्ण महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक व गुजरातमध्येही रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे.
वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी मराठी संगीताची धुरा आपल्या खांद्यावर घेणाऱ्या या गुणी युवकाने अनेक तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे. सुरेल गायन, भारदस्त आवाज आणि भावस्पर्शी सादरीकरण ही त्यांची खासियत असून, ‘भक्तीरंग’ कार्यक्रमातून रसिकांना अविस्मरणीय संगीतमय अनुभव मिळणार आहे.
हा कार्यक्रम सहकुटुंब, मित्रपरिवारासह अनुभवण्याची सुवर्णसंधी असून, ती गमावू नये, असे आवाहन लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. कार्यक्रमासाठी तिकीट विक्री इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे सुरू असून तिकीट दर माफक ठेवण्यात आले आहेत.
