लांजाचे सामाजिक कार्यकर्ते अरबाज नेवरेकर यांना ‘नॅशनल एक्सलन्स गोल्ड स्टार’ पुरस्कार जाहीर
- by Yogesh Bandagale
- September 28, 2025
- 51 views
लांजा (जि. रत्नागिरी) : लांजाचे युवा सामाजिक कार्यकर्ते अरबाज हाजिमिया नेवरेकर यांची "नॅशनल एक्सलन्स गोल्ड स्टार अवॉर्ड – 2025" या राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड झाली आहे. आधार सोशल फाउंडेशन, बेडकीहाळ (जि. बेळगाव, कर्नाटक) यांच्या वतीने हा पुरस्कार दिला जाणार आहे.
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. नेवरेकर यांना "राष्ट्रीय आदर्श समाजरत्न गौरव पुरस्कार" जाहीर झाला असून, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता कोल्हापूर येथील रिजेन्ता प्लेस, रायसन्स हॉटेल, ताराबाई पार्क येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्काराचे स्वरूप कोल्हापुरी फेटा, श्रीफळ, सन्मानचिन्ह, गौरवपत्र आणि मेडल असे असून, कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अरबाज नेवरेकर हे लांजा येथील प्रसिद्ध समाजसेवक पैगंबरवासी युनूसभाई नेवरेकर यांचे भाचे असून, त्यांनी सामाजिक कार्य, शिक्षण, आरोग्य आणि तरुणांमध्ये जनजागृती यासाठी लांजा आणि परिसरात सातत्याने कार्य केले आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल स्थानिक पातळीवरून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
आहेत.
