चिपळूणमध्ये ‘नाट्यरंगाविष्कार’ ; खल्वायनच्या दोन दर्जेदार नाटकांचे यशस्वी सादरीकरण
- by Yogesh Bandagale
- December 27, 2025
- 106 views
चिपळूण (प्रतिनिधी): अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, चिपळूण शाखेच्या वतीने आयोजित ‘नाट्यरंगाविष्कार’ या उपक्रमांतर्गत खल्वायन, रत्नागिरी निर्मित व डॉ. श्रीकृष्ण जोशी लिखित दोन दर्जेदार नाटकांचे सादरीकरण चिपळूणमध्ये मोठ्या रसिक प्रतिसादात संपन्न झाले.
दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी सादर झालेले ‘संगीत अमृतवेल’ हे नाटक ६२ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवणारे असून या नाटकाने आठ वैयक्तिक पारितोषिके पटकावली आहेत. संगीत, अभिनय आणि भावनात्मक मांडणी यांचा सुरेख संगम असलेल्या या नाटकाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
त्यानंतर दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी सादर झालेले नवे कोरे नाटक ‘स्वप्नपक्षी’ हे ६३ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सांघिक द्वितीय क्रमांकासह चार वैयक्तिक पारितोषिके मिळवणारे ठरले आहे. आशयघन कथा, प्रभावी संवाद आणि सशक्त अभिनयामुळे या नाटकानेही रसिकांची मने जिंकली.
दोन्ही नाटकांचे सादरीकरण अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे झाले असून उपस्थित रसिक प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांचे मनःपूर्वक कौतुक केले. चिपळूणसारख्या सांस्कृतिकदृष्ट्या सजग शहरात अशा दर्जेदार नाट्यप्रयोगांचे आयोजन होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, चिपळूण शाखेचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन, उपाध्यक्ष योगेश बांडागळे यांच्यासह नाट्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच ‘नाट्यरंगाविष्कार’ अंतर्गत सादर झालेली ही दोन्ही नाटके चिपळूणच्या नाट्यप्रेमी रसिकांसाठी एक अविस्मरणीय सांस्कृतिक अनुभव ठरली.
