ग्रामसभेत जनतेचा संताप; स्वयंघोषित कार्यकर्त्याची नांगी ठेचली! अखेर माफीनामा देत केली सुटका!
- by Yogesh Bandagale
- September 20, 2025
- 103 views
देवरूख (प्रतिनिधी): तालुक्यातील देवभूमी परिसरात शासकीय कामांमध्ये अकारण हस्तक्षेप करून प्रसिद्धीत राहण्याची हौस जोपासणाऱ्या एका स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्याला अखेर ग्रामसभेत जनतेच्या रौद्ररूपाचा सामना करत सर्वांसमक्ष जाहीर माफी मागावी लागली. या नाट्यमय घडामोडीमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दोन दिवसांपूर्वी संबंधित कार्यकर्त्याने स्थानिक उपकेंद्रातील एका महिला डॉक्टरांवर वेळेत कर्तव्यावर न येणे, रात्री रुग्णांना योग्य सुविधा न देणे अशा आरोपांच्या निमित्ताने तीव्र शब्दांत टीका केली. त्यामुळे संतप्त झालेल्या डॉक्टरांनी तडकाफडकी राजीनामा सादर केला.रुग्णसेवेत प्रामाणिकपणे कार्यरत असलेल्या या डॉक्टरांच्या राजीनाम्याने पंचक्रोशीत खळबळ माजली आणि ग्रामसभेत याचा जाब विचारण्यासाठी विशेष बैठक बोलावण्यात आली.“दुर्गम गावांत कोणी सहज डॉक्टर यायला तयार होत नाही. जे प्रामाणिकपणे सेवा देतात त्यांना त्रास दिला तर आमच्यासाठी इलाज कुठे? गरीबांना या आरोग्य केंद्रावर विश्वास आहे. मग कोणाच्या सांगण्यावरून डॉक्टरांवर तक्रारी करता? कोणत्या अधिकारात त्यांना दम देता?”सरपंच आणि ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले की, कोणालाही आरोग्य केंद्रात काही अनागोंदी दिसल्यास ते ग्रामपंचायत किंवा समितीच्या निदर्शनास आणावे. थेट डॉक्टर किंवा अधिकारी वर्गाला दम देणे सहन केले जाणार नाही.ग्रामस्थांचा आक्रोश आणि रोखठोक प्रश्न ऐकताच या तथाकथित कार्यकर्त्याची बोलती बंद झाली.
अखेर त्याने भावुक होऊन सर्वांसमक्ष जाहीर माफी मागत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.या बैठकीत माजी जिप अध्यक्ष रोहन बने, डॉ. रायबोळे, डॉ. वाजे, डॉ. भुसारी, प्रतिथयश व्यापारी व ग्राप सदस्य सतीश सप्रे, माजी सरपंच संतोष पाल्ये, महेंद्र गुरव, ताम्हाणेचे तेजकुमार टक्के, आंबवलीचे सरपंच किरवे, सांगावचे उपसरपंच विश्वास शेलार, कुडवलीचे माजी सरपंच दिनेश जाधव, अमित जाधव, धामापूरचे प्रशांत कांबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष भाई पवार, तुषार पवार, सौ. पुनम लिंगायत, सौ. प्रज्ञा कांबळे, सुहास पाष्टे, संतोष पाष्टे, संदीप पाष्टे, प्रविण शिंदे, पो. पो. पंकज जाधव, बाबू सावंत, महेंद्र गुरव, अनिल चव्हाण, पोलिस पाटील पंकज जाधव, प्रशांत पाष्टे, तुळशिराम शिगवण, बांबू सावंत, गणेश गुरव आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या घटनेनंतर गावोगावी चर्चा रंगली आहे की, विविध शासकीय समित्यांवर पदे भूषवून, भ्रष्टाचारमुक्ती, जंगल बचाव, जलदूत, पशुप्रेमी, सहसंपादक अशा नावांचा गवगवा करणाऱ्या या कार्यकर्त्याला जनतेने भर सभेत धडा शिकवला. यापूर्वीही त्याने अनेकांना त्रास दिला होता. परंतु यावेळी गावकऱ्यांच्या एकजुटीसमोर त्याला नांगी ठेचली गेली.“कर्तव्यदक्ष डॉक्टर आणि सेवाभावी अधिकारी हेच आमच्या गावाचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांना धक्का बसू दिला जाणार नाही. अशा कार्यकर्त्यांची शाबासकी चालणार नाही,” असा ठाम संदेश ग्रामस्थांनी दिला आहे.
