गोवळकोट-माप भागातील मचूळ पाणी प्रश्नावर नगराध्यक्ष उमेश सकपाळ ॲक्शन मोडवर
- by Yogesh Bandagale
- December 30, 2025
- 107 views
चिपळूण : गोवळकोट माप भागातील नागरिकांना दीर्घकाळापासून भेडसावणाऱ्या मचूळ व अशुद्ध पाण्याच्या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री. उमेश सकपाळ यांनी पदभार स्वीकारताच या विषयावर थेट ॲक्शन मोडमध्ये काम सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसह नगराध्यक्षांनी प्रत्यक्ष गोवळकोट जॅकवेल व नदीपात्राची पाहणी करत परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आणि तात्काळ उपाययोजना राबविण्याचे स्पष्ट आदेश दिले.
गोवळकोट-माप परिसरात पुरवण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये मचूळपणा व अशुद्धता आढळून येत असल्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत नगराध्यक्षांनी याआधीच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत स्वतंत्र बैठक घेऊन या समस्येवर सखोल चर्चा केली होती. या बैठकीत पाणीपुरवठ्याचे स्रोत, जुन्या व खराब झालेल्या पाईपलाईन, तांत्रिक अडचणी तसेच पाणी शुद्धीकरण प्रक्रियेतील त्रुटी यांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला.
या चर्चेदरम्यान कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर विशेष भर देण्यात आला. भविष्यात गोवळकोट विभागाला पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पर्यायी पाणीस्त्रोत, नवीन स्वतंत्र पाईपलाईन, अतिरिक्त जॅकवेल व्यवस्था, तात्पुरते व दीर्घकालीन उपाय यावर प्रत्यक्ष पातळीवर विचारमंथन करण्यात आले.
नगराध्यक्षांनी पाणीपुरवठा विभागाला स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, “नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व नियमित पाणीपुरवठा करणे ही नगरपालिकेची मूलभूत जबाबदारी आहे. त्यामुळे या प्रश्नावर कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही. गरज भासल्यास नवीन कामांचे प्रस्ताव, निधी व मंजुरी प्रक्रिया तातडीने राबवावी.”
या पाहणी व चर्चेदरम्यान नगरसेवक श्री. उदय जुवळे, पाणी विभागाचे अधिकारी श्री. रोहित खाडे, शिवसेना उपशहरप्रमुख श्री. सुयोग चव्हाण, श्री. दयानंद जुवळे तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित ग्रामस्थांनी आपल्या अडचणी व अनुभव मांडत या प्रश्नावर लवकरात लवकर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी नगराध्यक्ष श्री. उमेश सकपाळ यांनी ठाम शब्दांत सांगितले की, “नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. गोवळकोट, माप भागातील मचूळ पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले तातडीने उचलली जातील. नागरिकांना स्वच्छ पाणी मिळेपर्यंत प्रशासन स्वस्थ बसणार नाही.”
