अपघात टाळल्यास जीव व पैसा दोन्ही वाचेल : शौकतभाई मुकादम
- by Yogesh Bandagale
- January 10, 2026
- 51 views
चिपळूण : महाराष्ट्र शासनाने रस्ता सुरक्षा अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून, या अभियानात नागरिकांसह विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. रस्ता सुरक्षेचे नियम पाळल्यास अपघात टाळता येतील आणि त्यामुळे जीव व पैसा दोन्ही वाचेल, असे आवाहन माजी सभापती व पर्यावरणप्रेमी शौकतभाई मुकादम यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले की, दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालविताना अपघात झाल्यास आणि त्यातून गुन्हा दाखल झाल्यास तरुणांना नोकरी व पासपोर्ट मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी वाहन चालविताना अधिक जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. रस्ता सुरक्षा अभियानाचे अनेक फायदे असून, त्याबाबत जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे.
दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलणे, ट्रिपल सीट प्रवास करणे, हेल्मेट न वापरणे, तसेच चुकीच्या ठिकाणी वाहने उभी करणे हे सर्व कायद्याने गुन्हे असल्याचे नागरिकांनी लक्षात ठेवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भविष्यात दुचाकी वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास झूम कॅमेरे व सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीसांकडून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. चिपळूण शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, नियमभंग करणारे वाहन चालक थेट पोलीस मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षात दिसणार आहेत.
म्हणूनच तरुणांनी अशा गुन्ह्यांपासून दूर राहावे. एखाद्या तरुणावर गुन्हा दाखल झाल्यास त्याचा मानसिक त्रास केवळ त्यालाच नव्हे, तर त्याच्या आई-वडिलांनाही सहन करावा लागतो, याचे भान ठेवावे, असे आवाहन मुकादम यांनी केले.
रस्ता सुरक्षा अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी तालुक्यातील काही महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात आली असून, या शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागृती केली जाणार असल्याचेही शौकतभाई मुकादम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
