कोकणी मुस्लिमांच्या घरातील पारंपरिक भांडी ‘लोटिस्मा’ वस्तुसंग्रहालयात पाहायला मिळणार
- by Yogesh Bandagale
- September 22, 2025
- 178 views
चिपळूण : येथील शतकोत्तर हिरक महोत्सवी परंपरा लाभलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या रामभाऊ साठे वस्तुसंग्रहालयाला कोकणातील मुस्लिम समाजातील स्वयंपाकघरात वापरण्यात येणाऱ्या पारंपरिक भांड्यांची भेट मिळाली आहे.
संग्रहालयाला ही भांडी मुश्ताक आणि सईद देसाई बंधूंनी दिल्या. या भांड्यांना मिळवण्यासाठी वाचनालयाला रमण डांगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मुस्लिम समाजात या भांड्यांना आतून आणि बाहेरून कल्हई करून सजवले जाते. आता या कलात्मक भांड्यांचा अभ्यासक आणि रसिक लोकांना थेट संग्रहालयात पाहता येणार आहे.
सुमारे एक लाख रुपये किंमतीची ही भांडी संग्रहालयात मिळाल्याने देसाई बंधूंनी महत्त्वाची भर घातली आहे. ‘लोटिस्मा’च्या वतीने संस्थेचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव यांनी देसाई बंधूंना उपरणे व ग्रंथ भेट देऊन सत्कार केला. या कार्यक्रमात संस्थेचे संचालक प्रकाश घायाळकर आणि संजय शिंदे यांचीही उपस्थिती होती.
या भेटीद्वारे पारंपरिक वस्तू जपण्याचा आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहचवण्याचा उपक्रम यशस्वी ठरला आहे.
