निवे गणातील राष्ट्रवादी काँग्रेस मेळाव्यात कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- by Yogesh Bandagale
- September 21, 2025
- 78 views
देवरुख: संगमेश्वर तालुक्यातील निवे पंचायत समिती गणातील निवे बुद्रुक मधलीवाडी येथे शनिवारी सायंकाळी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यास कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आमदार शेखर निकम यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
मेळाव्यात कार्यकर्त्यांनी तरुण व तडफदार कार्यकर्ता प्रफुल्ल बाईत यांना उमेदवारी द्यावी, अशी ठाम मागणी केली. “प्रफुल्लच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत,” असे प्रतिपादन उपस्थित कार्यकर्त्यांनी केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात व्यासपीठावर आमदार शेखर निकम, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, राजेंद्र सुर्वे, चिपळूणचे माजी सभापती विजय (अप्पा) गुजर, माजी सभापती पूजा निकम, पंचायत समितीच्या माजी सदस्या स्मिता बाईत, माजी सरपंच मंगेश बांडागळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनी प्रफुल्ल बाईत यांच्या कार्याचा गौरव करत त्यांची ओळख “दशक्रोशीतील समस्या सोडविण्यासाठी नेहमी धावून जाणारा कार्यकर्ता” अशी केली. राजेंद्र पोमेंडकर, राजेंद्र सुर्वे आणि अप्पा गुजर यांनीही तळागाळातील कार्यकर्त्याच पक्षाचा कणा असल्याचे अधोरेखित केले आणि अशा कार्यकर्त्यांना बळ देणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले.
आमदार शेखर निकम यांनी सांगितले की, “खऱ्या अर्थाने कार्यकर्ता हा पक्ष वाढवणारा असतो. येणाऱ्या निवडणुकीत युती होईल की नाही हे सांगता येत नाही, मात्र आपली ताकद वाढवून प्रत्येक उमेदवार विजयी करूया. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादांच्या माध्यमातून या गणातील विकासकामांना गती देऊ.”
