कामथे येथे २०० खाटांचे नवे रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव
- by Yogesh Bandagale
- February 25, 2026
- 87 views
चिपळूण, दि. २५ (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचा स्तर उंचावण्याच्या दृष्टीने चिपळूण तालुक्यातील कामथे येथे २०० खाटांचे नवीन रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असून, यास तातडीने मंजुरी देण्याची मागणी आमदार शेखर निकम यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांना पत्राद्वारे केली आहे.
सध्या कामथे येथील उपजिल्हा रुग्णालय ५०+२० खाटांचे असून ते मुंबई-गोवा महामार्गालगत कार्यरत आहे. मात्र, रत्नागिरी जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे (DMER) हस्तांतरित झाल्यामुळे जिल्ह्यासाठी स्वतंत्र २०० खाटांचे सर्वसामान्य रुग्णालय आवश्यक झाले आहे. चिपळूण हे रत्नागिरी जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात असल्याने संगमेश्वर, खेड, गुहागर आदी तालुक्यांतील रुग्णांसाठी ते सोयीचे केंद्र ठरेल. त्यामुळे कामथे येथे २०० खाटांचे आधुनिक रुग्णालय उभारल्यास संपूर्ण जिल्ह्यास मोठा दिलासा मिळणार आहे.
या संदर्भातील प्रस्ताव जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी यांनी उपसंचालक, आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाकडे १६ डिसेंबर २०२५ रोजी सादर केला होता, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
आमदार शेखर निकम यांनी विनंती केली आहे की, शासन स्तरावर तातडीने मंजुरी देऊन संबंधित विभागांना आवश्यक निर्देश द्यावेत. कामथे येथे २०० खाटांचे आधुनिक रुग्णालय उभारल्यास कोकणातील आरोग्य सेवेला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
