जबरदस्ती सहन करणार नाही, आमदार भास्करराव जाधवांचा इशारा.
- by Yogesh Bandagale
- October 07, 2025
- 283 views
खेर्डीत जनआक्रोशाचा ज्वालामुखी! प्रीपेड मीटरविरोधात उसळला संताप.
चिपळूण, दि. ७: महाराष्ट्रात सरकारच्या जुलमी निर्णयाविरोधात जनतेत संतापाची लाट उफाळून आली आहे. मंगळवारी खेर्डीत काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चाने महावितरण कार्यालय घोषणांनी दणाणून गेले.
मोर्चाचे नेतृत्व शिवसेना नेते व आमदार भास्करराव जाधव यांनी केले, तर पुढाकार चिपळूण युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते यांनी घेतला. या जनआक्रोशात महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र आले, ज्यामुळे नागरिकांच्या मनातील संतापाला योग्य वाचा फोडण्याची संधी मिळाली.
महावितरणकडून वीजबिल दुप्पट-तिप्पट येऊ लागल्यामुळे जुने मीटर काढून बळजबरीने प्रीपेड मीटर बसवण्याच्या निर्णयाविरोधात जनता संतप्त झाली आहे. याच संतापाला वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
मोर्चात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाकत शहा, माजी जि.प अध्यक्ष विक्रांत जाधव, शिवसेना शहराध्यक्ष सचिन उर्फ भैय्या कदम, उपतालुका प्रमुख सचिन शेट्ये, काँग्रेसचे उपतालुका अध्यक्ष सुबोध सावंतदेसाई, राष्ट्रवादी पवार गटाचे उपतालुका अध्यक्ष सुनील गुरव, शिवसेनेचे विभाग प्रमुख विजय शिर्के, राम डिगे, सुरेंद्र शिंदे, सचिव संभाजी खेडेकर, शहर सचिव प्रशांत मुळ्ये, तालुका प्रसिद्धीप्रमुख सचिन चोरगे, उपविभाग प्रमुख मंगेश कोकीरकर, समीर सावंत, विभाग संघटक रोशन आंब्रे, शाखाप्रमुख सुनील नरळकर, भाऊ मोरे, युवासेना शहरप्रमुख पार्थ जागुष्टे, युवासेना विभाग अधिकारी राहुल भोसले, युवासेना सचिव प्रतीक शिंदे, तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष निर्मलाताई जाधव, शिवसेनेचे उपविभाग अधिकारी पल्लवी चव्हाण, युवा युवतीसेना तालुका अधिकारी शिवानी खताते, ओबीसी जिल्हा सेलचे महादेव चव्हाण, युवासेना शाखाप्रमुख निलेश शिगवण, वाहतूक सेना उपजिल्हाप्रमुख ओंकार पंडित, तसेच माजी सरपंच प्रवीण पाकळे आणि ग्रामपंचायत माजी सदस्यांकडून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
महावितरण कार्यालयासमोर मोर्चा येताच घोषणाबाजीने परिसर गाजवला. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना भेटून निवेदन सादर केले आणि प्रीपेड मीटरचा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. यापुढे एकही प्रीपेड मीटर बसवू नये, आधी बसवलेली मीटर तात्काळ काढावी, तसेच जबरदस्ती केली गेल्यास महाविकास आघाडी योग्य तो बंदोबस्त करेल असा इशारा देण्यात आला.
आमदार भास्करराव जाधव यांनी स्पष्ट सांगितले, “सरकार दुतोंडी – शब्द फिरवला तर योग्य बंदोबस्त करू!” त्यांनी सरकारला फटकारून सांगितले की, पावसाळी अधिवेशनात प्रीपेड मीटर फक्त सरकारी कार्यालयांसाठीच असल्याचे आश्वासन सरकारने दिले होते, परंतु आता ते आपले शब्द बदलत आहेत.
मोर्च्यात सहभागी जनतेनेही जोरदार पाठिंबा दर्शविला आणि वीज दरवाढ, चुकीची बिले, स्मार्ट मीटरचा फसवा खेळ आणि गलथान कारभार थांबवण्याची मागणी केली.
खेर्डीतील ही घटना महाराष्ट्रात प्रीपेड मीटरविरोधातील जनतेच्या वाढत्या असंतोषाचे प्रतीक ठरली असून, महावितरण आणि सरकारला यापुढे जनतेच्या आवाजाकडे दुर्लक्ष करू नये, असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.
