अपघातातील गंभीर जखमी सागर गमरे यांचा मृत्यू; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल
- by Yogesh Bandagale
- October 21, 2025
- 120 views
चिपळूण : चिपळूण–कराड मार्गावरील सती येथे ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या अपघातातील गंभीर जखमी सागर विजय गमरे (रा. वेहेळे बौद्धवाडी) या तरुणाचा उपचारादरम्यान कराड येथील रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी पोलिसांनी दुचाकीस्वार दिनेश चंद्रकांत पाटील याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रणजीत मनोहर गमरे (वय ४०, रा. वेहेळे-बौद्धवाडी, चिपळूण) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा पुतण्या सागर विजय गमरे दुचाकी (एमएच ०८ बीएच १६८६) घेऊन वेहेळेहून चिपळूण शहरातील काविळतळी येथे येत होता.
सायंकाळी सुमारे ४.३० वाजता सती संभाजीनगर येथे दिनेश चंद्रकांत पाटील (दुचाकी क्रमांक एमएच ०९ एफके ३३४८) याच्या दुचाकीशी त्याची समोरासमोर धडक झाली. या भीषण धडकेत सागर गमरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ उपचारासाठी कराड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
या अपघातप्रकरणी दिनेश पाटील याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
