साहेबांना ‘गिफ्ट’ द्यायचे राहून गेले
- by Yogesh Bandagale
- January 29, 2026
- 104 views
शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी एकत्र यावी, असा अजितदादांचा आग्रह – अंकुश काकडे
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांनी एक भावनिक किस्सा सांगितला आहे. 12 डिसेंबर रोजी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र आणण्याचे ‘गिफ्ट’ देण्याची इच्छा अजित पवारांची होती, मात्र ते स्वप्न अपूर्ण राहिल्याचे काकडे यांनी सांगितले.
अंकुश काकडे म्हणाले की, माझी आणि अजित पवारांची राजकीय सुरुवात एकाच काळात झाली. आम्ही दोघेही जिल्हा बँकेत एकत्र निवडून आलो आणि अनेक वर्षे एकत्र काम केले. अजित पवार हे आमचे नेते होते आणि शरद पवारांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचे काम त्यांनी केले, हे महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.
ते पुढे म्हणाले, शेवटच्या काळात अजित दादांचा एकच आग्रह होता—राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र यावी. ‘विठ्ठल शेठ, मणियार, श्रीनिवास पाटील यांच्याशी तुमचे चांगले संबंध आहेत, साहेबांशी बोला आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र कशा होतील यासाठी प्रयत्न करा,’ असे दादांनी मला सांगितले होते.
काकडे यांनी सांगितले की, या दृष्टीने प्रयत्नही सुरू होते आणि काही प्रमाणात वरिष्ठ पातळीवर सकारात्मक चर्चा झाली होती. महापालिका निवडणुकांसाठी एकत्र लढण्याचा निर्णयही झाला होता. मात्र, ऐनवेळी घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे हे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत.
12 डिसेंबर रोजी एकत्र येण्याची शक्यता होती, असे सांगताना काकडे म्हणाले, ‘खरं तर त्या दिवशी एकत्र येणार होतो. ते शक्य झाले नाही, पण निवडणुकीनंतर एकत्र येऊ, असे दादांनी म्हटले होते.’ 12 डिसेंबर हा शरद पवार यांचा वाढदिवस असल्याने, त्यांना हे राजकीय ऐक्याचे ‘गिफ्ट’ द्यायचे होते, हे यावरून स्पष्ट होते.
अजित पवार यांच्या जाण्याने केवळ एक नेता नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील ऐक्याचा एक महत्त्वाचा दुवा हरपल्याची भावना या वक्तव्यातून व्यक्त होत आहे.
