सदनिका गैरव्यवहार प्रकरण : क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंची शिक्षा कायम
- by Yogesh Bandagale
- December 16, 2025
- 38 views
नाशिक : राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत आले आहेत. शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणात प्रथम वर्ग न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची कारावासाची आणि दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. त्यामुळे कोकाटेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठी दिल्या जाणाऱ्या सदनिका बनावट कागदपत्रांच्या आधारे लाटल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना यापूर्वी प्रथम वर्ग न्यायालयाने प्रत्येकी दोन वर्षे कारावास व 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. या शिक्षेविरोधात कोकाटेंनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एम. बदर यांनी ही शिक्षा कायम ठेवली.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून माणिकराव कोकाटे विविध कारणांनी चर्चेत आहेत. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान मोबाईलवर रम्मी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर त्यांच्याकडील कृषिमंत्रीपदाचा पदभार काढून घेत त्यांना क्रीडामंत्रीपद देण्यात आले होते.
? काय आहे सदनिका गैरव्यवहार प्रकरण?
नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरातील ‘व्ह्यू अपार्टमेंट’मध्ये सुमारे 30 वर्षांपूर्वी मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठी सदनिका वाटप करण्यात आले होते. या सदनिका माणिकराव कोकाटे, त्यांचे भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने यांनी मिळवल्या होत्या. या वाटपात नियमबाह्य प्रक्रिया आणि बनावट दस्तऐवजांचा वापर झाल्याचा आरोप होता. तत्कालीन राज्यमंत्री स्व. तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी झाली होती.
प्रथम वर्ग न्यायालयानंतर आता जिल्हा सत्र न्यायालयानेही शिक्षा कायम ठेवल्याने माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
