यंदा दिवाळी पावसातच जाणार!
- by Yogesh Bandagale
- October 21, 2025
- 19 views
मुंबई : देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेतली असली तरी आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने राज्यभरात अवकाळी पावसाचे इशारे देण्यात आले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आजपासून (21 ऑक्टोबर) पुढील पाच दिवस महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसाचे इशारे देण्यात आले आहेत. कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
गेल्या दोन महिन्यांमध्ये मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पूरपरिस्थिती होती. अनेक जनावरे दगावली, घरे पाण्याखाली गेली. मोठी पडझड झाली. झालेल्या नुकसानातून वर येत असतानाच पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या इशाऱ्यामुळे नागरिक वैतागले आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजपासून, कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे 21 ऑक्टोबरपासून पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे.
