अपक्ष उमेदवार प्रफुल्ल कदम यांचा वाढता प्रभाव

प्रभाग क्रमांक १३, विभाग ‘ड’ मध्ये प्रचाराची रणधुमाळी

संदेश जिमन / ठाणे

ठाणे महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून प्रचाराची धग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशा वातावरणात प्रभाग क्रमांक १३, विभाग ‘ड’ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार प्रफुल्ल कदम सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

जनतेकडून मिळणारा वाढता प्रतिसाद आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्वामुळे प्रफुल्ल कदम यांच्यावरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र आहे. कोकणाचे सुपुत्र असलेल्या प्रफुल्ल कदम यांनी आजवर कोणत्याही मोठ्या पदाची अपेक्षा न ठेवता सामाजिक कार्याला प्राधान्य दिले आहे. शारीरिक शिक्षण शिक्षक व कराटे प्रशिक्षक म्हणून काम करताना त्यांनी सशक्त, जागरूक समाज घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. सामान्य नागरिकांचा दबलेला आवाज सुस्त प्रशासनापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने आपण निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या मुंबई-ठाणे परिसरात झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा आणि गंभीर बनला आहे. या प्रश्नावर ठामपणे संघर्ष करण्याची तयारी असल्याचे प्रफुल्ल कदम यांनी सांगितले. “हा काळ संघर्षाचा आहे. एकजुटीने लढलो तर विजय निश्चित आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुख-दुःखात कायम खंबीरपणे उभा राहणारा प्रतिनिधी निवडावा,” असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

ही लढाई सत्तेच्या सुखासाठी नसून हक्क, न्याय आणि सन्मानासाठी असल्याचा ठाम विश्वास त्यांनी मतदारांना दिला आहे. ‘केक’ हे त्यांचे निवडणूक चिन्ह असून, मतदारांनी मोठ्या संख्येने पाठिंबा द्यावा, असे नम्र आवाहन त्यांनी केले आहे.

नियोजित उद्देश, प्रामाणिक प्रचार आणि जनतेचा वाढता विश्वास यांच्या जोरावर अपक्ष उमेदवारही निवडणुकीत यशस्वी ठरू शकतात, असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त होत असून, जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडणाऱ्या उमेदवारांचे मनोरथ पूर्ण होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संबंधित लेख