बदलापूर प्रकरणात सहआरोपी तुषार आपटे भाजपच्या नगरसेवक पदावरून राजीनामा
- by Yogesh Bandagale
- January 11, 2026
- 72 views
बदलापूर: बदलापूर येथील शैक्षणिक संस्थेचे सचिव तुषार आपटे यांना कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेत 'स्वीकृत नगरसेवक' म्हणून भाजपने संधी दिली होती. मात्र या निर्णयावर राज्यभरातून मोठी टीका झाली.
बीबीसी मराठीशी बोलताना भाजप कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले की, प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार तुषार आपटे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. आपटे यांनीही काही वेळातच राजीनामा सादर केला.
तुषार आपटे हे दोन वर्षांपूर्वी बदलापूर शहरातील एका शाळेत दोन लहानग्या विद्यार्थिनींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात सहआरोपी होते. चौथीतील एका चिमुरडीवर शाळेतील स्वच्छतागृहात सफाई कर्मचारी अक्षय शिंदे यांनी अत्याचार केले होते. या घटनेच्या निषेधार्थ स्थानिकांनी निदर्शने केली, रेल्वे वाहतूक रोखून धरली होती आणि काही दिवस शहर बंद ठेवण्यात आले होते.
बदलापूरच्या नागरिकांनी प्रकरणाच्या निषेधार्थ हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. बदलापूर रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांवर उतरून नागरिकांनी रेल्वेमार्ग रोखला होता.
या प्रकरणात अक्षय शिंदे, शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपी दोघेही फरार होते, मात्र ३५ दिवसांनी कर्जत येथील एका फार्महाऊसवरून ठाणे गुन्हे शाखेने अटक केली. अद्यापही या प्रकरणात कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात खटला चालू आहे.
या घटनाक्रमामुळे बदलापूरमधील नागरिकांमध्ये शाळा व्यवस्थापन व स्थानिक प्रशासनावरील विश्वासाला धक्का बसला आहे, तसेच राजकीय निर्णयांवर टीका सुरू आहे.
