मतदार यादीतील त्रुटींवरून विरोधकांचा एल्गार; १ नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात भव्य मोर्चा
- by Yogesh Bandagale
- October 19, 2025
- 54 views
मुंबई : राज्यातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी, बोगस आणि दुबार नावे असल्याचा आरोप करत सर्वपक्षीय विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात एकत्र मोर्चेबांधणी केली आहे. या गंभीर त्रुटींविरोधात आवाज उठवण्यासाठी येत्या १ नोव्हेंबर रोजी मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा शिवसेना (ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
विरोधकांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने नुकतीच राज्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेत त्रुटींबाबत तक्रार केली होती. मात्र, त्यानंतर या त्रुटी न दूर झाल्याने विरोधकांनी आता थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना महाराष्ट्रात तब्बल ९६ लाख बोगस मतदार असल्याचा दावा केला. या दाव्यानंतर विरोधकांची बैठक शिवसेना भवन येथे झाली आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनाची घोषणा करण्यात आली.
आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
संजय राऊत म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या कारभारात मोठे घोटाळे उघड होत आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरात काँग्रेससह विरोधक आयोगाविरोधात लढत आहेत. दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत ही लढाई सुरू असून, लोकशाही टिकवण्यासाठी हा संघर्ष आवश्यक आहे,” असे राऊत यांनी सांगितले.
“घुसखोरांना बाहेर काढा” — राऊत यांचे आवाहन
राऊत पुढे म्हणाले, “राज ठाकरे यांनी आज बरोबर मुद्दा मांडला की महाराष्ट्रात निवडणुकीचे ‘मॅच फिक्सिंग’ सुरू आहे. ९६ लाख बोगस मतदार म्हणजे लोकशाहीवरील आघातच आहे. हे मतदार आमच्या दृष्टीने घुसखोर आहेत. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी घुसखोरांना शोधून मतदारयादीतून बाहेर काढण्याची घोषणा केली होती, मग त्यांनी या मोहिमेला महाराष्ट्रापासूनच सुरुवात करावी,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
विरोधक एकाच मंचावर
या पत्रकार परिषदेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट), मनसे, आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी उपस्थित होते. विरोधकांनी एकमुखाने निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला असून, मुंबईत या मोर्चात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीची शक्यता आहे.
निष्कर्ष
राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीतील त्रुटी आणि बोगस नावांच्या आरोपामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. आता १ नोव्हेंबरच्या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
