दिवाळीनंतर होणार स्थानिका स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी जाहीर होणार

मुंबई : जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता राज्यातील नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदांच्या आरक्षणाची सोडत येत्या सोमवारी (६ ऑक्टोबर) मंत्रालयात काढली जाणार आहे. या वेळी मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राज्य पक्षांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आमंत्रण पाठवण्यात आले आहे. दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळत असून, प्रशासकीय पातळीवर निवडणूकपूर्व प्रक्रिया सुरू आहे.

राज्य निवडणूक आयोगाने कळविल्यानुसार, १३ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यातील ३२ जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यापूर्वी १० ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी आरक्षण सोडतीसंदर्भातील सूचना वृत्तपत्रांत प्रसिद्ध करतील. १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत काढल्यानंतर प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध होईल. त्यावर १४ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यांचा विचार करून अंतिम अधिसूचना ३ नोव्हेंबर रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल.

दरम्यान, राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यावर १३ ऑक्टोबरपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत असणार आहे. अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी २८ ऑक्टोबर रोजी जाहीर होईल. विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीतील नाव, पत्ते याच आधारावर या स्थानिक संस्थांच्या याद्या तयार करण्यात येत आहेत.

 

संबंधित लेख