राज्यातील पूरपरिस्थितीमुळे १० टक्के एसटी भाडेवाढीचा निर्णय रद्द
- by Yogesh Bandagale
- October 01, 2025
- 136 views
मुंबई, दि. १ : राज्यातील पूरपरिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली १० टक्के बस भाडे दरवाढ रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री यांना देण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.
उपमुख्यमंत्री शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले, “एसटी महामंडळ दरवर्षी दिवाळीच्या काळात दहा टक्के भाडेवाढ करीत असते. यातून साधारणपणे महामंडळाला ३० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र यंदा राज्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती लक्षात घेऊन अपवाद म्हणून भाडेवाढ रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिले आहेत.”
राज्यात अनेक भागात अतिवृष्टी आणि पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार येऊ नये यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
