सातारा महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात नवा ट्विस्ट
- by Yogesh Bandagale
- October 27, 2025
- 195 views
सातारा (प्रतिनिधी) : फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणात आता एक धक्कादायक नवा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणाचा संबंध वाठार निंबाळकर येथील दिपाली पाचांगणे (वय 24) या विवाहितेच्या आत्महत्येशी जोडला जात असल्याचा आरोप मृत दिपालीच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. दिपालीच्या आई-वडिलांनी शवविच्छेदन अहवालात फेरफार केल्याचा थेट आरोप केला असून, या प्रकरणाला राजकीय दबावाची छाया असल्याची शंका व्यक्त केली आहे.
दिपाली पाचांगणे यांचे 2021 मध्ये अजिंक्य निंबाळकर या लष्करी अधिकाऱ्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर तिला सतत सासरकडून मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. अखेर 19 ऑगस्ट 2025 रोजी दिपालीने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे पोलिसांनी निष्कर्ष काढला होता. मात्र, या प्रकरणातील शवविच्छेदन अहवालात छेडछाड झाल्याची शक्यता दिपालीच्या आई भाग्यश्री पाचांगणे यांनी व्यक्त केली आहे.
“शवविच्छेदन अहवालावर सही करणारी डॉक्टर म्हणजे आता आत्महत्या केलेली महिला डॉक्टर!” — कुटुंबीयांचा गंभीर आरोप
भाग्यश्री पाचांगणे म्हणाल्या,
“माझ्या मुलीच्या मृत्यूनंतर तब्बल पाच दिवस शवविच्छेदन अहवाल देण्यात आला नव्हता. तो अहवाल ज्यांनी तयार केला त्या महिला डॉक्टरवरच दबाव होता, आणि त्या आता आत्महत्या केलेल्या आहेत. या दोन्ही प्रकरणांचा संबंध स्पष्ट आहे आणि त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास आवश्यक आहे.”
या संदर्भात त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडवकर यांना तपासाची मागणी करणारे निवेदन दिले आहे. कुटुंबाच्या आरोपांमुळे प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे.
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय पाच दिवस पोलिस कोठडीत
आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरने आपल्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पीएसआय गोपाल बदने याच्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा थेट आरोप केला होता. तसेच घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर याने चार महिन्यांपासून सतत मानसिक आणि शारीरिक छळ केला असल्याचा उल्लेख होता.
या प्रकरणातील आरोपी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने स्वतःहून फलटण ग्रामीण पोलिसांकडे शरण आला. पोलिसांनी चौकशीनंतर रविवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
दरम्यान, या प्रकरणाला राजकीय दबाव, पोलिसांचे संगनमत, तसेच वैद्यकीय प्रणालीवरच्या नैतिक प्रश्नांचे गंभीर पडसाद उमटत आहेत. दोन्ही प्रकरणातील तपासाची दिशा आता निर्णायक ठरणार आहे.
